
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रामायण' चित्रपटात मूळ कथेचा विपर्यास करून रावणाचे उदात्तीकरण आणि प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या व्यक्तिरेखांचे अवमूल्यन केल्याच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 20 नोव्हेंबर रोजी मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाबाहेर 'हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन' करण्यात आले. कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही अशाच प्रकारे निदर्शने पार पडली. कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धास्थानाची मोडतोड करून विशिष्ट वैचारिक अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये व संवाद तातडीने हटवावेत आणि आगामी भाग प्रदर्शनापूर्वी संत, रामायण अभ्यासक व धर्मशास्त्रांच्या जाणकारांना दाखवावेत, या प्रमुख मागण्यांसाठी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या.
हिंदु जनजागृती समितीचा आक्षेप
चित्रपटातील अनेक प्रसंग पाहिल्यानंतर हा प्रभू श्रीरामांच्या आदर्शांचा चित्रपट आहे की रावणाचे उदात्तीकरण करणारी कथा, असा गंभीर प्रश्न हिंदु जनजागृती समितीने उपस्थित केला आहे. एकीकडे अस्त्रशस्त्रांनी सज्ज असलेले प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता राक्षसांना घाबरून पळ काढताना दाखवले आहेत, तर दुसरीकडे निशस्त्र रावण हजारो सैनिकांशी एकटाच झुंज देऊन त्यांचा संहार करत असल्याचे चित्रण करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर गरिबांना सोन्याची घरे देणारा आणि शोषितांचा तारणहार अशी रावणाची प्रतिमा रंगवण्यात आली आहे. एका दासीची छेड काढल्यामुळे शूर्पणखेचा पती विद्युत्जिव्ह याचा वध करणारा रावण महिलांचा रक्षक असल्याचे दाखवले गेले, मात्र त्याच रावणाने माता सीतेचे अपहरण केल्याचे सत्य जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले आहे. हा केवळ दिग्दर्शकाचा कल्पनाविलास नसून मूळ रामायणातील आदर्श आणि व्यक्तिरेखांचे जाणीवपूर्वक केलेले विकृतीकरण असल्याचा आरोप हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात आला आहे.
मुंबई: कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मुंबईतील दादर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळणार आहे. कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून 21 नोव्हेंबर ...
सेन्सॉर बोर्डाने या गंभीर बाबींकडे डोळेझाक का केली?
भारतीय सिनेमॅटोग्राफ अधिनियम, 1952 आणि केंद्र सरकारच्या प्रमाणन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणत्याही धार्मिक समूहाचा अवमान करणाऱ्या किंवा महिलांचे अवमूल्यन करणाऱ्या दृश्यांवर बंदी घालण्याचे स्पष्ट नियम आहेत. असे असतानाही या चित्रपटाला प्रमाणपत्र देताना त्या नियमांचे पालन झाले का, याचे स्पष्टीकरण सेन्सॉर बोर्डाने द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. इतर धर्मांच्या भावना दुखावणाऱ्या चित्रपटांवरील आक्षेपांची तात्काळ दखल घेतली जाते, मग हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा प्रश्न येतो तेव्हाच प्रमाणन मंडळ उदासीन भूमिका का घेते, असा संतप्त सवाल उपस्थित करत या चित्रपटाचे तात्काळ पुनर्परीक्षण करून मंडळाने आपली भूमिका जाहीर करावी, असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.






