Tuesday, October 6, 2026

Nashik Crime : गर्भवतीच्या पोटावर लाथा मारल्या, बळजबरीने गर्भपात केला अन्... ; नाशिकरोडमध्ये लिव्ह-इन कराराच्या नावाखाली महिलेवर अत्याचार

Nashik : लग्नाचे आमिष दाखवत लिव्ह-इन रिलेशनशिपचा करारनामा तयार करून महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकरोड परिसरात समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर गर्भवती असलेल्या महिलेच्या पोटावर लाथा मारून मारहाण केल्याचा तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मोबाईल फोन फोडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) मुख्य संशयितासह पाच जणांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लिव्ह-इन करार करून लग्नाचे आमिष

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय उर्फ सोनू जयद्रथ काकडे (वय ३३, रा. रोकडोबावाडी, काकडे गल्ली, उपनगर) हा या प्रकरणातील मुख्य संशयित आहे. फिर्यादीनुसार, ऑक्टोबर २०२४ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत नाशिकरोड येथील हॉटेल ग्रेट मराठा, मीना बाजार परिसर तसेच दत्त मंदिर सिग्नलजवळील हिमालय सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये पीडितेवर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. पीडितेचा विश्वास संपादन करण्यासाठी संशयिताने तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपचा करारनामा केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर या कराराचा आधार घेत तसेच लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तीन वेळा गर्भपात केल्याचा आरोप

तक्रारीनुसार, या संबंधातून पीडिता अनेक वेळा गर्भवती राहिली. मात्र, संशयिताने तिला बाळ जन्माला घालू न देता तीन वेळा गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकारामुळे पीडितेला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, २३ सप्टेंबर २०२६ रोजी या प्रकरणातील कथित हिंसाचाराचा प्रकार घडल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संशयिताने पीडितेला चारचाकी वाहनातून नांदूर नाका मार्गे विंचूरच्या पुढील एका लॉन्सजवळ नेल्याचा आरोप आहे. तेथे तिला वाहनातून खाली खेचून तिच्या पोटातील बाळाला इजा व्हावी, या उद्देशाने पोटावर लाथा मारून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पुरावे नष्ट करण्यासाठी मोबाईल फोडल्याचा आरोप

मारहाणीनंतर आपल्याविरोधात पुरावे राहू नयेत, यासाठी संशयित धनंजय काकडे आणि त्याच्या चार साथीदारांनी पीडितेचा मोबाईल फोन जबरदस्तीने फोडून नष्ट केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडितेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार मुख्य संशयितासह पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक आहेर करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >