Nashik : रेशन दुकानांसमोरील रांगा, दुकानांच्या अनियमित वेळा आणि ई-पॉस यंत्रातील तांत्रिक अडचणींमुळे होणारा त्रास आता लवकरच दूर होणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत महाराष्ट्रातील पहिले स्वयंचलित धान्य वाटप केंद्र अर्थात ‘धान्य एटीएम’ नाशिकमध्ये सुरू करण्यात येत आहे. नाशिकरोड येथील सरकारी धान्य कोठारात हे धान्य एटीएम बसविण्यात आले असून, जिल्हा पुरवठा विभागाकडून १५ ऑक्टोबरपर्यंत ते कार्यान्वित करण्याची तयारी सुरू आहे. या एटीएममधून लाभार्थ्यांना दिवसाचे २४ तास धान्य घेता येणार आहे.
या स्वयंचलित केंद्राची धान्य साठवणूक क्षमता सुमारे ३० क्विंटल आहे. यामध्ये गहू आणि तांदूळ उपलब्ध करून दिला जाणार आहे. साठा संपल्यानंतर यंत्रामध्ये तातडीने पुन्हा धान्य भरण्याची सुविधा उपलब्ध असल्याने सरकारी धान्य कोठाराची जागा यासाठी निवडण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यासही धान्य वाटपाच्या प्रक्रियेत अडथळा येऊ नये, यासाठी या केंद्राला सौर ऊर्जेची सुविधाही देण्यात आली आहे.
Nashik : राज्याच्या अनेक भागांतून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू असतानाच नाशिकमध्ये ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवू लागला आहे. शहरातील तापमानाने ...
आधार किंवा रेशन कार्ड क्रमांक टाकून मिळणार धान्य
धान्य एटीएमचा वापर करण्यासाठी लाभार्थ्याला स्वतःचा आधार क्रमांक किंवा रेशन कार्ड क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर बायोमेट्रिक फिंगरप्रिंटद्वारे ओळख पडताळणी केली जाईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याच्या हक्काच्या धान्याची माहिती स्क्रीनवर दिसेल.प्रक्रिया पूर्ण होताच यंत्रातून निर्धारित प्रमाणात धान्य आपोआप आणि अचूकपणे लाभार्थ्याच्या पिशवीत वितरित केले जाईल. विशेष म्हणजे, हे यंत्र सुमारे पाच मिनिटांत ५० किलोपर्यंत धान्य वितरित करण्याची क्षमता ठेवते.
‘वन नेशन, वन रेशन कार्ड’चा लाभ
हे धान्य एटीएम थेट ई-पॉस प्रणालीशी जोडण्यात आले आहे. ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेंतर्गत नाशिक शहर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र तसेच देशाच्या इतर भागातील पात्र रेशनकार्डधारकांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. राज्यात नाशिक आणि नागपूर येथे धान्य एटीएमचा प्रयोग राबविला जात आहे. नाशिकमधील केंद्र अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असेल. या केंद्रातून वितरित होणारे धान्य पूर्णपणे मोफत असणार आहे.
Nashik Crime : महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत माजी विद्यार्थ्याने महिला प्राध्यापिकेचा ऑनलाइन छळ केल्याचा धक्कादायक प्रकार ...
नाशिक जिल्ह्यात १० लाख शिधापत्रिकाधारक
नाशिक जिल्ह्यात सुमारे १० लाख शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत. यापैकी सुमारे १ लाख ९० हजार लाभार्थी अंत्योदय अन्न योजनेतील असून, उर्वरित लाभार्थी प्राधान्य कुटुंब योजनेत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात सुमारे ३६ लाख नागरिकांपर्यंत मोफत धान्याचा लाभ पोहोचविला जात आहे. ई-पॉस यंत्रातील तांत्रिक अडचणी, धान्याच्या मोजमापाबाबत निर्माण होणारी साशंकता, रेशन दुकानांच्या वेळा आणि प्रतीक्षा यावर तोडगा काढण्यासाठी धान्य एटीएम उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे पारंपरिक रेशन व्यवस्थेला तंत्रज्ञानाची जोड मिळून लाभार्थ्यांना अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक पद्धतीने धान्य मिळण्याची अपेक्षा आहे.