Nashik : नाशिक-वलसाड महामार्गावरील पेठ तालुक्यातील करंजाळीलगतच्या सावळ घाटात खासगी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. घाट परिसरात दाट धुके असल्याने दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.अपघातग्रस्त बस नाशिक येथील चौधरी ट्रॅव्हल्सची असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. ही बस नाशिकहून अहमदाबादच्या दिशेने निघाली होती. बसमध्ये सुमारे २५ प्रवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.
दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी
पेठ आणि दिंडोरी तालुक्यात मंगळवारी रात्री कमालीचे धुके होते. घटनास्थळी अवघ्या दोन फुटांपर्यंतचीही दृश्यमानता नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज घेण्यात अडचण आली असावी आणि त्यातून बसवरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. करंजाळी घाटात सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, ज्या ठिकाणी बसचा अपघात झाला, त्या भागात रस्त्याचे काम सुरू नसल्याचे घटनास्थळी पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाची धाव
रात्री सुमारे ११ वाजता अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विविध भागांतून चार रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आल्या. अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर मध्यरात्री सुमारे दोन वाजता आठ जणांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
Nashik : पावसाने विश्रांती घेतल्याने आणि धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक स्थितीत असल्याने नाशिक जिल्ह्यातील २६ मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांमधून होणारा ...
दोघांचा मृत्यू; सात जखमी
या अपघातात राहुल ओझा आणि महेंद्र पाल (४८, वडोदरा, गुजरात) यांचा मृत्यू झाला. तर प्रमिला राऊत (५३, पाटीलनगर, सिडको, नाशिक), यश देसाई (३०, अहमदाबाद), आरती देसाई (२८, अहमदाबाद), बाल विमल जगदीश (६५, इरोड, तामिळनाडू), नयन वासाने (२७, इंदिरानगर, गुजरात), स्वाती सुरेश बडाणे (४८, गोपालनगर, कामटवाडे, नाशिक) आणि सुरेश बडाणे (५८, नाशिक) हे जखमी झाले. जखमींपैकी दोन रुग्णांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार जखमींवर उपचार करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. तर एका प्रवाशाची तपासणी करण्यात आली असून त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे प्रशासनाने सांगितले.
अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी
बस रस्त्यातच उलटल्याने नाशिक-वलसाड महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचणाऱ्या स्थानिक अधिकारी आणि यंत्रणांनाही या वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागला. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.