Wednesday, October 7, 2026

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकची बँकिंग यंत्रणा सज्ज ! रोख पुरवठ्यापासून डिजिटल व्यवहारांपर्यंत विशेष नियोजन

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक आणि पर्यटक दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाढणारी वित्तीय व्यवहारांची गरज लक्षात घेऊन राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या उच्चस्तरीय बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली.

Nashik Kumbhmela : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक, पर्यटक आणि नागरिकांना सुरक्षित व अखंडित वित्तीय सेवा मिळाव्यात यासाठी जिल्ह्यातील बँकिंग व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येणार आहे. रोख रकमेचा पुरवठा, एटीएम, मोबाईल एटीएम तसेच डिजिटल व्यवहारांसाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक आणि पर्यटक दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाढणारी वित्तीय व्यवहारांची गरज लक्षात घेऊन राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या उच्चस्तरीय बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली.

नाशिकची रोख मर्यादा वाढविण्याची तयारी

राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक झाली. भारतीय रिझर्व्ह बँक, वित्तीय सेवा विभाग, विविध व्यावसायिक बँकांचे वरिष्ठ अधिकारी तसेच नाशिक जिल्ह्याचे अग्रणी बँक व्यवस्थापक भिवा लवाटे यांच्यासह संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील वित्तीय आणि पायाभूत सुविधांच्या गरजांचे सविस्तर सादरीकरण केले. नाशिकची सध्याची सुमारे ६ हजार कोटी रुपयांची रोख मर्यादा वाढविण्याबाबत आरबीआय बेलापूरकडून सकारात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या काळात रोख पैशांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने त्यानुसार बँकिंग यंत्रणा सज्ज ठेवण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

गर्दीच्या ठिकाणी मोबाईल एटीएम

कुंभमेळा क्षेत्रातील वाहनतळ, साधुग्राम, प्रमुख नदीघाट आणि गर्दीच्या अन्य ठिकाणी मोबाईल एटीएम वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविकांना रोख रक्कम काढण्यासाठी बँक शाखा किंवा दूरच्या एटीएमवर अवलंबून राहावे लागणार नाही. यासोबतच कॅश चेस्ट्सची क्षमता वाढविण्यात येणार असून, कुंभमेळ्याच्या संपूर्ण कालावधीत रोख रकमेचा पुरेसा आणि सुरळीत पुरवठा राहील, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.

यूपीआय आणि डिजिटल व्यवहारांवर भर

कुंभमेळ्याच्या काळात रोख व्यवहारांसोबतच डिजिटल व्यवहारांनाही मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येणार आहे. लहान विक्रेते, वाहतूक सेवा पुरवठादार आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये पीओएस यंत्रांची संख्या वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच यूपीआय व्यवहारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ई-केवायसी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठीही संबंधित पातळीवर कार्यवाही केली जाणार आहे.

दुर्गम भागातही बँकिंग सेवा

कुंभमेळ्याच्या काळात दुर्गम तसेच मोठी गर्दी होणाऱ्या भागांमध्ये बँकिंग सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी बँकिंग कॉरस्पाँडंट्सचे जाळे विस्तारित करण्यात येणार आहे. या प्रतिनिधींना आवश्यक प्रशिक्षण देण्यासोबतच त्यांची व्यवहार क्षमता वाढविण्यात येणार आहे. तसेच मायक्रो-क्रेडिट सुविधांचा विस्तार करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

आरबीआयच्या पुढाकाराने विशेष बैठक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वित्तीय व्यवस्थेचा अंतिम आराखडा निश्चित करण्यासाठी आरबीआयच्या पुढाकाराने सर्व बँकांची विशेष बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत रोख पुरवठा, एटीएम, मोबाईल एटीएम, कॅश चेस्ट्स आणि डिजिटल व्यवहारांच्या सुविधांचे अंतिम नियोजन केले जाणार आहे. कुंभमेळ्याच्या कालावधीत प्रत्येक भाविक, पर्यटक, व्यापारी आणि नागरिकाला सुरक्षित, सुलभ आणि निर्विघ्न वित्तीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरबीआय आणि बँकिंग क्षेत्र समन्वयाने काम करणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >