
Nashik : नाशिकच्या क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरात राष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत फुटबॉल मैदान विकसित करण्यास तसेच हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर अत्याधुनिक हाय-मास्ट फ्लडलाइट्स उभारण्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली आहे. या सुविधांमुळे नाशिकमध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसोबतच व्यावसायिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. कान्हेरे मैदानावर फ्लडलाइट्सची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर येथे रात्रीच्या क्रिकेट सामन्यांसह नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करता येणार आहेत. तर नव्या फुटबॉल मैदानावर राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि व्यावसायिक लीगमधील सामने घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
नाशिक बनणार ‘स्पोर्ट्स हब’
गेल्या काही वर्षांत नाशिकने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणारे धावपटू, क्रिकेटपटू तसेच विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडू घडविले आहेत. मात्र, उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधांचा अभाव असल्याने अनेक खेळाडूंना सरावासाठी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांकडे जावे लागत होते. आता नाशिकमधील खेळाडूंना स्थानिक पातळीवरच दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून या प्रकल्पांना चालना मिळाली आहे. या सुविधांचे काम लवकरच सुरू होणार असून, भविष्यात नाशिकची महाराष्ट्रातील नवे ‘स्पोर्ट्स हब’ म्हणून ओळख निर्माण होईल, असा विश्वास जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी व्यक्त केला.
मानेनगरमध्ये आठ एकरांवर फुटबॉल मैदान
पंचवटीतील मानेनगर परिसरात क्रीडा विभागाची सुमारे आठ एकर जागा असून, या जागेची फुटबॉल मैदानासाठी निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी उच्च दर्जाची हिरवळ, योग्य सांडपाणी व्यवस्था, पाण्याचा निचरा करण्यासाठी आधुनिक यंत्रणा तसेच मानक आकारानुसार मैदानाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे खेळाडूंना नियमित सरावासाठी दर्जेदार आणि सुरक्षित मैदान उपलब्ध होईल. सध्याच्या सामान्य किंवा खडबडीत मैदानांवर खेळताना खेळाडूंना दुखापतींचा धोका वाढतो. अत्याधुनिक मैदानामुळे हा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच नाशिकमध्ये राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धा आणि व्यावसायिक लीग आयोजित करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.
Nashik : नाशिकचा पौराणिक, ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारसा जगभरातील पर्यटकांसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी शहरात दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात ...
कान्हेरे मैदानावर आता ‘नाईट क्रिकेट’
आधुनिक क्रिकेटमध्ये दिवस-रात्र सामने आणि टी-२० क्रिकेटला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उभारण्यात येणाऱ्या हाय-मास्ट फ्लडलाइट्समुळे नाशिकच्या क्रिकेटपटूंना रात्रीच्या प्रकाशात सराव करण्याची सुविधा मिळणार आहे. नोकरी, शाळा आणि महाविद्यालयामुळे दिवसा वेळ न मिळणाऱ्या खेळाडूंनाही सायंकाळनंतर किंवा रात्री सराव करता येणार आहे. याशिवाय नाशिकमध्ये नाईट क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या सुविधेमुळे स्थानिक क्रिकेटपटूंना मोठ्या व्यासपीठावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. भविष्यात नाशिकच्या खेळाडूंची आयपीएल, रणजी करंडक तसेच राष्ट्रीय स्तरावरील संघांमध्ये निवड होण्याच्या संधी वाढण्यास या सुविधांचा फायदा होऊ शकतो.
क्रीडा पर्यटनालाही मिळणार चालना
नव्या क्रीडा सुविधांमुळे नाशिकमध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी बाहेरील खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि क्रीडाप्रेमी शहरात दाखल होतील. परिणामी हॉटेल, वाहतूक, खानपान आणि इतर स्थानिक व्यवसायांना चालना मिळून नाशिकच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होण्याची शक्यता आहे. उच्च दर्जाच्या मैदानांवर नियमित सराव केल्यामुळे नाशिकच्या खेळाडूंची शारीरिक क्षमता, खेळाचा वेग आणि तांत्रिक कौशल्य विकसित होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकच्या खेळाडूंचा ठसा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.






