
Nashik : नाशिकचा पौराणिक, ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारसा जगभरातील पर्यटकांसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी शहरात दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येणार आहेत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आडगाव शिवारात जागतिक दर्जाचे रामायणावर आधारित उद्यान, तर पंचवटीतील गणेशवाडी येथे डिजिटल अनुभव केंद्र (DEC) विकसित करण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.
महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. याशिवाय नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक २२ मधील यशवंत मंडईचा डीबीएफओटी (Design, Build, Finance, Operate and Transfer) तत्त्वावर विकास करण्यासही मंजुरी देण्यात आली.
महापालिकेच्या तिजोरीवर भार नाही
या तिन्ही प्रकल्पांसाठी डीबीएफओटी पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. या माध्यमातून संबंधित खासगी कंपनी प्रकल्पाची रचना, बांधकाम आणि आर्थिक गुंतवणूक करून त्याचे संचालन करेल. ठरावीक कालावधीनंतर प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित केला जाणार आहे. त्यामुळे प्रकल्प उभारणीसाठी महापालिकेला मोठा आर्थिक खर्च करावा लागणार नसून, महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
Nashik : पावसाने विश्रांती घेतल्याने आणि धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक स्थितीत असल्याने नाशिक जिल्ह्यातील २६ मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांमधून होणारा ...
आडगावमध्ये रामायण उद्यान
आडगाव शिवारातील सर्वे क्रमांक ७७२ पैकी महापालिकेच्या आरक्षित क्षेत्रात रामायणावर आधारित भव्य उद्यान उभारण्यात येणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प नाशिकच्या पर्यटनाला मोठी चालना देणारा ठरण्याची अपेक्षा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रामायणातील विविध प्रसंग पर्यटकांना प्रत्यक्ष अनुभवता येतील, अशा पद्धतीने उद्यानाची रचना करण्यात येणार आहे. यामध्ये ३६० अंशांचा इमर्सिव्ह डोम, रॉयल ॲम्पी थिएटर, श्रीराम मंदिराची प्रतिकृती, खाद्यगृह यांसह विविध पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे नाशिकमधील हॉटेल व्यवसाय, पर्यटन संस्था, वाहतूक सेवा तसेच स्थानिक व्यावसायिक आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
गणेशवाडीत डिजिटल अनुभव केंद्र
नाशिकचा पौराणिक इतिहास, सांस्कृतिक वारसा, अध्यात्मिक ओळख आणि ऐतिहासिक प्रवास पर्यटकांना आधुनिक पद्धतीने अनुभवता यावा, यासाठी पंचवटीतील गणेशवाडी मार्केट येथे सुमारे ७,५०० चौरस मीटर जागेवर डिजिटल अनुभव केंद्र (DEC) विकसित करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये डिजिटल तंत्रज्ञान, आभासी अनुभव, प्रोजेक्शन मॅपिंग आणि दृक-श्राव्य माध्यमांचा प्रभावी वापर करून नाशिकची यशोगाथा पर्यटकांसमोर सादर केली जाणार आहे. हे केंद्र वर्षभर पर्यटकांसाठी खुले ठेवण्याचे नियोजन आहे. अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यटकांना मनोरंजनासोबतच नाशिकच्या इतिहास आणि वारशाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.
Nashik : नाशिक-वलसाड महामार्गावरील पेठ तालुक्यातील करंजाळीलगतच्या सावळ घाटात खासगी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर सात जण ...
पर्यटकांचा मुक्काम वाढविण्यावर भर
नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांना अधिकाधिक काळ शहरात थांबवून पर्यटनाशी संबंधित स्थानिक व्यवसायांना चालना देणे, हा या प्रकल्पांमागील प्रमुख उद्देश आहे. रामायण उद्यान आणि डिजिटल अनुभव केंद्रामुळे नाशिकच्या पर्यटनाला नवी ओळख मिळण्यासोबतच शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडणार आहे.





