८९५ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा, ६८ हजार ४३६ महिलांना प्रमाणपत्र
मुंबई : शेतीतील महिलांच्या योगदानाला ओळख देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, ७ ऑक्टोबरपर्यंत तब्बल ३७ लाख ९३ हजार ५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८९५ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्यात आली असून, ६८ हजार ४३६ महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक पात्र महिला शेतकरी या उपक्रमाशी जोडली जावी, यासाठी कृषी विभागाकडून नोंदणीला गती देण्यात येत असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’नुसार महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख, समान अधिकार आणि शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्राची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सार्वजनिक जीवनातील सेवाकार्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि ...
प्राप्त अर्जांमध्ये यवतमाळ जिल्हा आघाडीवर असून तेथून २ लाख ५३ हजार ४३९ अर्ज आले आहेत. त्यापाठोपाठ सातारा २ लाख १४ हजार ७८७, नाशिक २ लाख १० हजार ३२७, अमरावती २ लाख ५ हजार ७४, तर पुणे जिल्ह्यातून १ लाख ७३ हजार ४९ अर्ज प्राप्त झाले आहेत. बुलढाणा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नंदुरबार, जळगाव, नांदेड, धाराशिव, धुळे, बीड आणि जालना या जिल्ह्यांतूनही प्रत्येकी एक लाखांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे. तालुकानिहाय नोंदणीत सातारा जिल्ह्यातील कराड तालुका आघाडीवर असून तेथे ३५ हजार ४२२ नोंदणी झाली आहे.
ग्रामसभा झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत पात्र महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरित केले जाते. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांतून नोंदणी होत असून, जिल्हा आणि तालुकानिहाय नोंदणीचे कृषी विभागाकडून सातत्याने संनियंत्रण केले जात आहे. ज्या भागांत नोंदणी कमी आहे, तेथे जनजागृती करून नोंदणी वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १७ सप्टेंबर रोजी महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानात विविध विभागांच्या तुलनेत कृषी विभागात सर्वाधिक नोंदणी झाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. महिला शेतकऱ्यांचा या उपक्रमातील सहभाग वाढत असून, उर्वरित पात्र महिलांनी लवकरात लवकर ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन भरणे यांनी केले आहे.