Thursday, October 8, 2026

Revenue Staff Promotion : कोकण महसूल विभागात मोठा निर्णय: 39 कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती!

याच निवडसूचीतून 9 सहायक महसूल अधिकारी आणि 4 मंडळ अधिकारी अशा आणखी 13 कर्मचाऱ्यांना तदर्थ पदोन्नती मिळाली आहे.

मुंबई : कोकण विभागातील महसूल विभागात कार्यरत असलेल्या 39 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. सहायक महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी संवर्गातील या कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार (गट-ब, राजपत्रित) संवर्गात पदोन्नती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

या पदोन्नतीमध्ये 13 कर्मचाऱ्यांना नियमित पदोन्नती, 13 कर्मचाऱ्यांना तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी तदर्थ पदोन्नती मिळालेल्या आणखी 13 कर्मचाऱ्यांची पदोन्नती नियमित करण्यात आली आहे.

सन 2025-26 च्या निवडसूचीनुसार 8 सहायक महसूल अधिकारी आणि 5 मंडळ अधिकारी अशा एकूण 13 कर्मचाऱ्यांना नियमित पदोन्नती देण्यात आली. याच निवडसूचीतून 9 सहायक महसूल अधिकारी आणि 4 मंडळ अधिकारी अशा आणखी 13 कर्मचाऱ्यांना तदर्थ पदोन्नती मिळाली आहे.

दरम्यान, सन 2023-24 च्या निवडसूचीतून यापूर्वी तदर्थ पदोन्नती मिळालेल्या 13 कर्मचाऱ्यांची पदोन्नती आता नियमित करण्यात आली आहे. यामध्ये 10 सहायक महसूल अधिकारी आणि 3 मंडळ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सन 2025-26 या निवडसूची वर्षातील उपलब्ध पदांवर त्यांची पदोन्नती नियमित करण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त, कोकण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीतील शिफारशीनुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पदोन्नती देताना 1 जानेवारी 2025 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची विचारात घेण्यात आली. तसेच वरिष्ठ कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची खात्री करण्यात आली. संबंधित न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून या पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, पदोन्नती प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करून पात्र कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना सेवेत पुढे जाण्याची संधी मिळेल. तसेच महसूल विभागाचे कामकाज अधिक सक्षम होऊन नागरिकांना सेवा देण्यास मदत होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >