Friday, November 27, 2026

भिवंडीत चिकन शोरमामुळे विषबाधा; रुग्णसंख्या 116 वर, 107 जण रुग्णालयात

भिवंडीतील वंजारपट्टी नाका येथील ए. के. शोरमा स्टॉलवरील चिकन शोरमा खाल्ल्याने विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या ११६ वर पोहोचली आहे. १०७ जण रुग्णालयात उपचार घेत असून, दोन मुलांसह दोन महिलांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

भिवंडीत रस्त्याच्या कडेला असलेल्या शोरमाच्या गाड्यावर चिकन शावरमा खाल्ल्याने विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या अवघ्या दोन दिवसांत दुप्पटीहून अधिक झाली आहे. सुरुवातीला ५६ रुग्ण होते, ती संख्या आता ११६ वर पोहोचली आहे. उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि ताप अशा लक्षणांनी रुग्ण त्रस्त आहेत. यातील १०७ रुग्ण अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर प्रकृती बिघडलेल्या दोन लहान मुलांसह दोन महिलांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नऊ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या सुमारे पाच महिन्यांतील शोरमामुळे झालेली ही दुसरी मोठी विषबाधेची घटना आहे.

भिवंडीतील वंजारपट्टी नाका येथील ए. के. शोरमा या अनधिकृत स्टॉलवरील शावरमा खाल्ल्याने ही विषबाधा झाली. हा स्टॉल स्थानिक नागरिक, नोकरदार आणि तरुणांमध्ये लोकप्रिय होता. अवघ्या ५० रुपयांत मिळणारा चिकन शोरमा कबूस या मध्यपूर्वेतील पिटासारख्या भाकरीत चिकन आणि गार्लिक मेयोनीजसोबत दिला जायचा. महापालिकेने हा स्टॉल पाडून टाकला असून, मालक सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

या विषबाधेत ५६ पुरुष, ३५ महिला आणि २५ मुलांचा समावेश आहे. सोमवारी शोरमा खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अनेकांना त्रास सुरू झाला. त्यांना इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी एका गर्भवती महिलेसह आणखी आठ जणांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना अजूनही उलट्या आणि जुलाबाचा त्रास आहे. या आठही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र उलट्या आणि जुलाब थांबायला अँटिबायोटिक्सच्या मदतीने वेळ लागेल, असं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं.

या घटनेमुळे भिवंडीत रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अनधिकृत स्टॉलवर कोणतीही तपासणी न होता अन्न विकलं जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने अशा स्टॉलवर कारवाई करावी आणि अन्नपदार्थांची नियमित तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >