
मुंबई : पुणे शहरातील अवैध होर्डिंग आणि अतिक्रमणांविरोधात महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. अवैध होर्डिंग लावणाऱ्यांची नावे ‘पुरस्कार यादी’च्या स्वरूपात जाहीर करण्याच्या महापालिकेच्या पुणेरी शैलीतील उपक्रमावर त्यांनी मिश्कील टिप्पणीही केली. ‘उद्या माझ्या नावाचेही अवैध होर्डिंग लावले, तर पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा,’ असे फडणवीस म्हणाले.
पुण्यातील अतिक्रमण आणि अवैध होर्डिंगविरोधातील कारवाईबद्दल महापालिका प्रशासनाचे अभिनंदन करताना फडणवीस म्हणाले, सार्वजनिक जागांचा वापर नागरिकांना योग्य पद्धतीने करता आला पाहिजे. रस्त्यांवर वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांनाही पुरेशी जागा मिळणे आवश्यक आहे. नियम हे फक्त सरकारी आदेश आणि कागदपत्रांपुरते मर्यादित नसून त्यांचे प्रत्यक्ष पालन झाले पाहिजे. सामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करणे, हा नियमांचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या लोकसभा खासदारांना तीन ओळींचा व्हीप ...
अवैध होर्डिंगची समस्या एकट्या पुण्यापुरती मर्यादित नसून देशभरातील शहरांसमोरील आव्हान आहे. त्यामुळे त्याविरोधात सातत्याने आणि नियमित कारवाई होणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेने यासाठी स्वीकारलेली अनोखी आणि वास्तववादी पुणेरी पद्धत कौतुकास्पद असल्याचे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, आगामी काळात नागपूर येथे विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. या काळात नागपूरमध्येही अवैध होर्डिंग लावण्याची स्पर्धा सुरू होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यामुळे नागपूर प्रशासनाने आतापासूनच जनजागृती मोहीम सुरू करावी आणि शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.
पुणे महापालिकेने अवैध होर्डिंगविरोधातील कारवाईदरम्यान आपल्या ‘एक्स’ खात्यावरून पुणेरी शैलीत पोस्ट प्रसिद्ध केल्या होत्या. सुरुवातीला सत्ताधारी भाजपच्या नेत्यांची नावे ‘पुरस्कार यादी’त जाहीर करण्यात आली. त्यानंतर महापौर, विरोधी पक्षनेते आणि विविध गटांच्या नेत्यांच्या होर्डिंगवरही उपरोधिक टिप्पणी करण्यात आली. या पोस्टमुळे महापालिका अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये वादाची स्थिती निर्माण झाली होती. आता मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे समर्थन केल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.






