Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर चोरट्यांचा धुमाकूळ ! शेअर मार्केट, टास्क स्कॅम आणि व्यवसायातील भागीदारीच्या आमिषाने १ कोटींची फसवणूक

Nashik Crime : झटपट श्रीमंत होण्याच्या मोहाचा फायदा घेत सायबर भामट्यांनी नाशिक शहरात फसवणुकीचे जाळे पसरवले आहे. शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा, ऑनलाइन टास्कद्वारे घरबसल्या कमाई आणि व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष दाखवून शहरातील नागरिकांना तब्बल १ कोटी ७ लाख ५९ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी गंगापूर, नाशिकरोड आणि सायबर पोलीस ठाण्यांत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष भोवले


शेअर बाजारात गुंतवणूक करून अल्पावधीत मोठा नफा मिळवण्याच्या आमिषाने मखमलाबाद नाका परिसरातील नागरिकांची फसवणूक करण्यात आली. संशयितांनी ‘वैल्थ डिस्कशन २३’ या व्हॉट्सॲप व सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून तसेच विविध मोबाईल क्रमांकांवरून फिर्यादींशी संपर्क साधला. गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळत असल्याचे भासवण्यासाठी सुरुवातीला आभासी नफा दाखवण्यात आला. त्यामुळे विश्वास बसलेल्या फिर्यादी आणि त्यांच्या साथीदारांनी टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यांमध्ये एकूण ७५ लाख ९ हजार ६६२ रुपये जमा केले. मात्र, गुंतवलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे करीत आहेत.



पोल्ट्री व्यवसायातील भागीदारीच्या नावाखाली २५ लाखांचा गंडा


ऑनलाइन फसवणुकीबरोबरच व्यवसायात भागीदारी देण्याच्या बहाण्यानेही नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे नाशिकरोड येथील प्रकरणातून समोर आले आहे. सामनगाव रोड परिसरात राहणारे अविनाश विजय खताळ (वय ३०) यांना संशयित गणेश अंबादास बिडगर आणि अंबादास रुंजा बिडगर (दोघेही रा. दरेगाव, ता. चांदवड) यांनी पोल्ट्री व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष दाखवले. पोल्ट्री फार्मचे तिसरे शेड उभारून त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून दरमहा ५० हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले. या व्यवहारासाठी नाशिकरोड येथील जुन्या कोर्टाजवळ नोटरी दस्त करून २५ लाख रुपये घेण्यात आले. मात्र, ही रक्कम पोल्ट्री व्यवसायासाठी वापरण्याऐवजी स्वतःचे वैयक्तिक कर्ज फेडण्यासाठी वापरल्याचा आरोप आहे. खताळ यांनी पैसे परत मागितले असता त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.



टास्क स्कॅममध्ये नागरिकाची फसवणूक


गंगापूर रोड परिसरातील विश्वजीत सुनील काठे (वय ३३) यांना टेलिग्रामवरून ऑनलाइन कमाईची ऑफर देण्यात आली. गुगल मॅपवर हॉटेल आणि रेस्टॉरंटला पाच स्टार रेटिंग देऊन त्याचे स्क्रीनशॉट पाठवायचे आणि घरबसल्या पैसे कमवायचे, असे त्यांना सांगण्यात आले. सुरुवातीला छोट्या रकमेचा नफा दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर बँक ऑफ बडोदातील नूर आलम सुभान अली अन्सारी यांच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. पैसे पाठवल्यानंतर ‘तुमचा बारकोड चुकला असून रिफंड मिळवण्यासाठी आणखी एक लाख रुपये भरावे लागतील,’ असे सांगून अतिरिक्त रकमेची मागणी करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काठे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.



नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन


अल्पावधीत मोठा नफा, घरबसल्या सहज कमाई किंवा व्यवसायातील निश्चित उत्पन्न अशा आमिषांना बळी पडू नये. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून ऑनलाइन पैसे हस्तांतरित करू नयेत. गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्था आणि व्यक्तींची खातरजमा करावी. संशयास्पद आर्थिक व्यवहार किंवा ऑनलाइन फसवणूक झाल्यास तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.


महत्त्वाचे : ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास भारतातील सायबर क्राइम हेल्पलाइन क्रमांक १९३० वर त्वरित संपर्क साधता येतो. तसेच "राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टल" (https://cybercrime.gov.in/) वर तक्रार नोंदवता येते.

Comments
Add Comment

Smit Machchhar : भारतीय वैमानिकाच्या शौर्याला इस्रायलचा सलाम! स्मित मच्छर यांना नागरी शौर्य पुरस्कार जाहीर

International News: फ्लायदुबईच्या विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी धैर्याने परिस्थितीचा सामना करणारे भारतीय

Nashik Saptashrungi Devi : श्री सप्तशृंगीगडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी ! नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीत मोठे बदल ; एसटी बसचा मार्ग जाणून घ्या

Nashik Saptashrungi Devi : नवरात्रोत्सव आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री सप्तशृंगीगडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या 17 स्थानकांना सुरक्षा मंजुरी; उद्घाटनाची तारीख चर्चेत

पुणे : हिंजवडी आयटी पार्कला पुणे शहराशी जोडणाऱ्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मोठा निर्णय ? त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव

Nashik : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेली विकासकामे वेगाने पूर्ण

Mumbai Water Supply : मुंबईतील पाणी कपात लवकरच घेतली जाणार मागे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये सध्या ९४.५० टक्के पाणी साठा मुंबईकरांची

Nana Patekar : महापालिका स्थायी समितीच्या सभेत नानांना नगरसेवकांनी वाहिली श्रध्दांजली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी गोव्यात ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन