लोकसहभागाच्या जोरावर ग्रामसमृद्धीचा नवा आदर्श घालत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीने 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025-26' मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नाशिक येथे पार पडलेल्या एका शानदार आणि भव्य सोहळ्यात हा बहुमान प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आडाचीवाडी ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. यासह 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0, 2026-27' चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, पद्मश्री पोपटराव पवार आणि इतर आमदार व मान्यवर उपस्थित होते. आडाचीवाडी ग्रामपंचायतीने मिळविलेला हा राज्यस्तरीय बहुमान ग्रामीण महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्याला कारणंही तसंच आहे. गावाने केवळ पुरस्कारच जिंकला नाही, तर आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्रासमोर विकासाचा एक आदर्श मॉडेल उभे केले आहे.
लोकसहभाग आणि अचूक नियोजनातून आडाचीवाडीची गरुडझेप
आडाचीवाडी ग्रामपंचायतीने 100 टक्के कर वसुली, पाण्याचे चोख नियोजन व व्यवस्थापन, आणि गावकऱ्यांच्या साथीने राबवलेली विकासकामे या जोरावर राज्यासमोर ग्रामविकासाचा एक नवा वस्तुपाठ ठेवला आहे. गावाच्या याच उल्लेखनीय आणि आदर्श कामगिरीची दखल घेत ग्रामपंचायतीला 5 कोटी रुपयांचे रोख बक्षीस आणि मानाचे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 : जलसुरक्षित, समृद्ध गावांचा संकल्प!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 2026-27' योजनेचा शुभारंभ केला. ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येनुसार स्वतंत्र गट, सुधारित पुरस्कार रचना आणि प्रत्यक्ष कामांच्या गुणवत्तेवर आधारित मूल्यमापनातून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0’ अधिक व्यापक व परिणामकारक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. जलसंधारण, जलस्रोतांचे बळकटीकरण, स्वच्छता, हरित गाव आणि लोकसहभागावर विशेष भर देत दुष्काळावर मात करून शाश्वत ग्रामविकास साधण्याचा या अभियानाचा संकल्प आहे. या अभियानातील महत्त्वाचे बदल आणि जलसुरक्षित, समृद्ध गाव घडविण्याच्या उद्देशाची सविस्तर माहिती...
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #SamruddhaPanchayatRajAbhiyan
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 11, 2026
मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन अर्थात एसआरए प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि त्यांमधील कायदेशीर पेच सोडवण्यासाठी राज्य सरकारने एक ...
आडाचीवाडीने दाखवला ग्रामविकासाचा आदर्श
आडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या या यशामागे ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, उपलब्ध साधनांचा योग्य वापर, पाण्याचे चोख नियोजन आणि प्रशासकीय शिस्त यांचे मोलाचे योगदान आहे. लोकांच्या एकजुटीतून गावाचा कायापालट कसा होऊ शकतो, हेच आडाचीवाडीने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी आडाचीवाडीच्या सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि संपूर्ण गावकऱ्यांचे जाहीर अभिनंदन केले आहे.