उत्सवातील बचतीतून शेतकऱ्यांना मदत करा; देवी चरणी साकडे घालत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
ठाण्याच्या प्रसिद्ध टेंभी नाका नवरात्रोत्सवात 48 व्या वर्षी आई दुर्गेश्वरीचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीच्या चरणी बळीराजासाठी साकडे घातले. राज्य आणि केंद्र सरकार दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नवरात्र मंडळांनीही उत्सवातील बचतीतून शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
October 11, 2026 09:56 PM
उत्सवातील बचतीतून शेतकऱ्यांना मदत करा; देवी चरणी साकडे घालत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन (Photo: @mieknathshinde X Account)
ठाण्यातील प्रसिद्ध टेंभी नाका येथील ‘श्री जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळा’च्या आई दुर्गेश्वरीचे यंदा मोठ्या उत्साहात आगमन झाले. देवभूमी उत्तराखंडमधील 'श्री बद्रीनाथ मंदिरा'च्या भव्य प्रतिकृतीत देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून यंदा उत्सवाचे हे 48 वे वर्ष आहे. या सोहळ्याला उपस्थित राहत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे, असे साकडे त्यांनी देवीच्या चरणी घातले. तसेच, संकटाच्या काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, "बळीराजाची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही," असा दृढ निर्धार त्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारकडून भरीव मदतीचे आश्वासन
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून केंद्रीय पथक गेले असून, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली असून केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. दुष्काळग्रस्तांना सवलती, नुकसानभरपाई आणि संकटग्रस्त कुटुंबांना आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिवसेनेच्या वतीने मराठवाड्यातील 25 हजार शेतकरी कुटुंबातील मुलींना सायकली आणि 25 हजार महिलांना शिलाई मशीन वाटपाचा शुभारंभ परभणीतून करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. या कामांमुळे दोन्ही ...
उत्सवातील बचतीतून शेतकऱ्यांना मदतीचा हात
दुष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मंडळाने यंदा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, उत्सवातील बचतीतून शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाणार आहे. हाच आदर्श घेत इतर नवरात्र मंडळांनीही उत्सवाच्या खर्चात काही बचत करून बळीराजाच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. या सोहळ्यात ठाणे पोलिसांच्या वतीने देवीला पारंपारिक मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व लाखो भाविक उपस्थित होते.