Monday, October 12, 2026

Nashik : समृद्ध पंचायतराजमध्ये नाशिक जिल्ह्याची ‘डबल धमाल’! जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत राज्यात प्रथम

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही प्रवर्गांत प्रथम क्रमांक पटकावत नाशिकचे दुहेरी यश

Nashik : ग्रामीण विकासाच्या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याने राज्यात आपला ठसा उमटवला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही प्रवर्गांत प्रथम क्रमांक पटकावत नाशिकने दुहेरी यश संपादन केले. त्यातच बागलाण तालुक्यातील लाडूद ग्रामपंचायतीने विभागून द्वितीय क्रमांक मिळवत तीन कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले. पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीने पाच कोटी रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळवले. पंचवटीतील यूथ फेस्टिव्हल मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण आणि २०२६-२७ च्या अभियानाचा शुभारंभ उत्साहात झाला.

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ५,६४४ ग्रामपंचायती सहभागी झाल्याची माहिती दिली. या टप्प्यात ६९ लाख १३ हजार आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली, तर २,७०६ किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाली. घरकुलांचे लाभ, दिव्यांगांना मदत, सीसीटीव्ही यंत्रणा, स्वच्छतागृहे, व्यायामशाळा, जलपुनर्भरण आणि सौरऊर्जेच्या वापरालाही प्रोत्साहन देण्यात आले. ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढवण्यासाठी घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीवर भर देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवून ग्रामीण विकासाला गती द्यावी, असे आवाहन गोरे यांनी केले.कार्यक्रमाला आमदार गोकुळ गीते, प्रा. देवयानी फरांदे, दिलीप बनकर, डॉ. राहुल आहेर, अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार उपस्थित होते.

जलसंधारण आणि शाश्वत विकासाला प्राधान्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण विकासात लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण, पाण्याचे योग्य नियोजन आणि शाश्वत ग्रामविकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. जलतज्ज्ञ प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ आणि पद्मश्री पोपटराव पवार यांनीही या वेळी मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषद प्रवर्गात नाशिक प्रथम, पुणे द्वितीय

ग्रामपंचायत प्रवर्गात पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडीने प्रथम क्रमांकासह पाच कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवले. रत्नागिरी जिल्ह्यातील खामशेत आणि नाशिक जिल्ह्यातील लाडूद ग्रामपंचायतींनी विभागून द्वितीय क्रमांक पटकावला. दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी तीन कोटी रुपये देण्यात आले. लातूर जिल्ह्यातील उटी बुद्रुक आणि नागपूर जिल्ह्यातील कोतवालबर्डी यांनी विभागून तृतीय क्रमांक मिळवला. जिल्हा परिषद प्रवर्गात नाशिक प्रथम, पुणे द्वितीय, तर सांगली जिल्हा तृतीय ठरला. पंचायत समिती प्रवर्गात नाशिकने प्रथम क्रमांक मिळवला. रायगड जिल्ह्यातील खालापूर पंचायत समिती द्वितीय, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समिती तृतीय ठरली.

दरम्यान, या वेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह आमदार, वरिष्ठ अधिकारी आणि राज्यभरातील सरपंच उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >