नाशिक: आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. शहरातील विकासकामे, गोदाघाट परिसरातील सुविधा, रामतीर्थ व कुशावर्त तीर्थ येथील कामे, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनाला गती देण्यात येत आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलिस यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि विविध आखाड्यांच्या समन्वयातून भाविकांना सुरक्षित व सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
प्रशासकीय यंत्रणांची उच्चस्तरीय बैठक व समन्वय
प्राधिकरणाच्या कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त शेखर सिंह यांनी यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, भक्तीचरणदास महाराज, पुरोहित संघाचे सतीश शुक्ला, पंचाक्षरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांची सुरक्षितता, सार्वजनिक वाहतूक आणि परिसरातील हालचालींच्या नियोजनाला प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच विविध धार्मिक संस्था, आखाडे आणि संत-महंतांशी चर्चा करून त्यांच्या आवश्यकतांनुसार कार्यक्रमांचे अंतिम नियोजन केले जाणार आहे.
25 ऑक्टोबर रोजी होणार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदणारा 'शंखनाद'
ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आगामी 25 ऑक्टोबर 2026 रोजी विशेष 'शंखनाद' कार्यक्रम पार पडणार आहे. या उपक्रमाची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद होणार असून, याचे प्रमाणपत्र थेट ध्वजारोहण सोहळ्यात प्रदान केले जाईल. याशिवाय सिंहस्थ कुंभमेळ्यावर आधारित विशेष टपाल तिकिटाचे अनावरण, प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण, कॉफीटेबल बुकचे प्रकाशन आणि सायंकाळी गोदावरी नदीची भव्य आरती असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
मुंबई: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने मुंबई CSMT ते ...
महानगरपालिकेची व्यापक स्वच्छता आणि घाटविकास मोहीम
महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले की, ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीनिमित्त पालिकेमार्फत व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. रामकुंड परिसरासह गोदावरी नदीच्या घाटांवर स्वच्छता, परिसर सुशोभीकरण आणि आवश्यक पायाभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. गांधी तलाव परिसरातील स्वच्छता, गोदाघाट परिसरातील बांधकामे, फरसबंदी, काँक्रीटीकरण आणि भाविकांसाठी शौचालयांसारख्या मूलभूत सुविधा कार्यान्वित करण्यावर भर दिला जात आहे. बांधकामामुळे साचलेला राडारोडा हटवून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम प्राधान्याने केले जात आहे.
नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन
या पूर्वतयारीदरम्यान सुरू असलेल्या विकासकामांतून नागरिकांना काहीसा तात्पुरता त्रास संभवू शकतो; मात्र ही कामे भाविकांच्या सुविधा आणि शहराच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक शहर स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करत सर्व यंत्रणांच्या समन्वयातून वेळेत कामे पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.