गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज (१३ ऑक्टोबर) पणजी येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धर्तीवर आता गोवा राज्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू करण्यात आला आहे. आरोग्यदूत आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचे मूळ संकल्पक मंगेश चिवटे यांना या कार्यक्रमासाठी गोव्यात विशेष निमंत्रित करण्यात आले होते. यामुळे गोवा राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी 17 मार्च 2015 रोजी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रथमतः मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू करावा अशी संकल्पना मांडली होती. ही योजना महाराष्ट्रात लोकप्रिय झाल्यानंतर इतर राज्यातही महाराष्ट्र मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धर्तीवर ही योजना सुरू व्हावी यासाठी योजनेचे मूळ संकल्पक आरोग्यदूत मंगेश चिवटे हे परिश्रम घेत आहेत. यासाठीच त्यांनी काही महिन्यांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गोवा राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हा कक्ष सुरू करण्याची संकल्पना मांडली होती. या प्रस्तावाला मुख्यमंत्री सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर गोवा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या उपक्रमाला मंजुरी देण्यात आली आणि आज या संकल्पनेचे प्रत्यक्षात रूपांतर झाले.
या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्यातर्फे गोवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाला एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. गोवा राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मदत मिळावी, या सामाजिक बांधिलकीतून हा धनादेश देण्यात आला. महाराष्ट्रात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळाली आहे. याच यशस्वी कार्यपद्धतीच्या धर्तीवर गोव्यातही स्वतंत्र वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू झाल्याने आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.