
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये गाजलेल्या बहुचर्चित आणि थरारक ‘निळा ड्रम’ हत्या प्रकरणात न्यायालयाने अखेर निकाल दिला आहे. पती सौरभ राजपूत याच्या निर्घृण हत्येप्रकरणी न्यायालयाने त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मेरठचे जिल्हा न्यायाधीश अरविंद कुमार मिश्रा यांनी हा निकाल दिला असून, दोन्ही दोषींवर प्रत्येकी 20,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. निकाल सुनावताना दोन्ही आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. शिक्षा ऐकताच मुस्कान आणि साहिल दोघेही न्यायालयात ढसाढसा रडू लागले. दुसरीकडे, मृत सौरभच्या कुटुंबीयांनी या निकालावर समाधान व्यक्त केले असून, न्यायालयाकडून न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
१९ महिने आणि ११ दिवसानंतर आला निकाल
३ मार्च २०२५ रोजी सौरभ राजपूतची अत्यंत निर्घृणपणे हत्या करून त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे करण्यात आले आणि ते तुकडे एका निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये सिमेंटने पॅक करून लपवण्यात आले होते. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास पूर्ण करून दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. जुलै २०२५ मध्ये जिल्हा न्यायालयात खटला सुरू झाला. न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे आधीच दोघांना हत्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते, त्यानंतर शिक्षेवर सुनावणी झाली.
हे पुरावे ठरले शिक्षेचा आधार
हत्येच्या रात्री साहिलला सौरभच्या घरात जाताना पाहणाऱ्या साक्षीदाराची साक्ष. हत्येत वापरलेला चाकू आणि उस्तरा मुस्कान आणि साहिलच्या माहितीवरून जप्त करणे. साहिल आणि मुस्कान यांच्या दरम्यानचे कॉल रेकॉर्ड्स आणि सोशल मीडियावरील चॅटिंग. सौरभचा मित्र संजीव पाल, सौरभची आई रेनू यांच्या कॉल डिटेल्स आणि साक्ष. मुस्कान आणि साहिल ज्या हॉटेल्समध्ये थांबले होते तिथले सीसीटीव्ही फुटेज आणि हॉटेल मॅनेजरचे जबाब. खटल्यादरम्यान एकूण २२ साक्षीदारांची नोंद करण्यात आली.
रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही भरती क्रिकेट टीमसाठी जणू काही आधारस्तंभ राहिले आहेत. जशी हिऱ्याची पारख जोहरीला असते तशी जसप्रीत बुमराहची ...
न्यायालयातील सुनावणीदरम्यान काय घडले?
शिक्षा सुनावण्यापूर्वी सकाळी जिल्हा न्यायाधीशांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुस्कान आणि साहिलचे म्हणणे ऐकून घेतले. जेव्हा न्यायाधीशांनी मुस्कानला विचारले की तिला काय म्हणायचे आहे, तेव्हा तिने आपल्या दोन लहान मुलींचा हवाला देत त्यांच्या पालनपोषण आणि काळजी घेण्याची विनंती केली आणि गप्प बसली. साहिलने शिक्षेबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. तसेच यापूर्वी कोणताही गुन्हा केला नसल्याचे त्याने सांगितले. सरकारी वकील के.के. चौबे यांनी गुन्ह्याची भीषणता लक्षात घेता दोघांना मृत्युदंड देण्याची मागणी केली. तर बचाव पक्षाच्या वकिलांनी मुस्कानची दोन मुले आणि वृद्ध आई-वडिलांचा हवाला देत दया दाखवण्याची आणि कमी शिक्षा देण्याची अपील केली होती. मात्र, न्यायालयाने सर्व बाजू तपासून दोघांना फाशीची शिक्षा सुनावली.
कशी घडली घटना?
- २०१४-१५: मेरठच्या एका महाविद्यालयात सौरभ आणि मुस्कानची भेट झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लव मॅरेज केले. लग्नानंतर काही वर्षे सर्व ठीक होते, पण हळूहळू नात्यात दुरावा आला आणि आयुष्यात 'तिसऱ्या व्यक्तीची' (साहिल) एंट्री झाली.
- फेब्रुवारी २०२५: लग्नाचा वाढदिवस आणि मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सौरभ २४ फेब्रुवारीला नोकरी सोडून मेरठला घरी परतला. त्याच्या परतल्यामुळे मुस्कान आणि साहिलच्या भेटीगाठी बंद झाल्या, ज्यातून त्यांनी हत्येचा कट रचला.
- ३ मार्च २०२५ (हत्येची रात्र): मुस्कान आणि साहिलने मिळून सौरभच्या जेण्यात विष मिसळून त्याला बेशुद्ध केले आणि नंतर अत्यंत निर्घृणपणे त्याची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर दोघांनी मृतदेहाजवळच वेळ घालवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेहाचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये सिमेंटने पॅक केले. त्यानंतर दोघे फिरायला हिमाचल प्रदेशला निघून गेले.
- १९ मार्च २०२५: पोलिसांनी कसून तपास करत मुस्कान आणि साहिलला अटक करून तुरुंगात पाठवले.
- १२ मे २०२५: पोलिसांनी न्यायालयात चार्जशीट (आरोपपत्र) दाखल केले.
- १७ सप्टेंबर २०२६: खटला (Trial) पूर्ण झाला.
- ३० सप्टेंबर २०२६: न्यायालयाने दोघांना हत्येप्रकरणी दोषी ठरवले.
- १४ ऑक्टोबर २०२६: न्यायालयाने दोघांना फाशीची शिक्षा सुनावली.





