Wednesday, October 14, 2026

Chhatrapati Sambhajinagar : मी सरकारी अधिकारी ! खोटं बोलून लग्न उरकलं ; सत्य समोर येताच नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शासकीय सेवेत अधिकारी असल्याचे खोटे सांगून लग्न केलेल्या तरुणाच्या खोटेपणाचे बिंग फुटल्यानंतर, संसारातील विवंचनेला कंटाळून अवघ्या 23 वर्षांच्या नवविवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याचा संतापजनक प्रकार समोर वानखेडेनगर परिसरात आला आहे. लग्नानंतर अवघ्या चारच महिन्यांत पतीचे बोगस रूप उघडकीस आल्याने आणि सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने टोकाचे पाऊल उचलले. संजना निलेश शेजवळ (वय 23) असेल मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे, तर निलेश शेजवळ असे आरोपी पतीचे नाव आहे.

मुलीच्या सुखासाठी वडिलांनी मोठे कर्ज काढलं पण...

मिळालेल्या माहितीनुसार, संजना ही जालना येथील रावसाहेब मगर यांची धाकटी मुलगी. संगणकशास्त्रात डिप्लोमाचं शिक्षण घेतल्यानंतर एखादं चांगलं स्थळ बघून लग्न करून द्यावं, असं कुटुंबीयांना वाटत होतं. तेव्हाच नीलेश शेजवळ याचं स्थळ चालून आलं. नीलेश शासकीय विभागात अधिकारी असल्यानं आणि त्याचे वडीलही शासकीय विभागातच कार्यरत असल्यामुळे एक प्रतिष्ठित आणि चांगल्या कुटुंबातील स्थळ आहे, या विश्वासावर मुलीच्या वडिलांनी मोठे कर्ज काढून ४ जून २०२६ रोजी थाटामाटात तिचा विवाह लावून दिला. मात्र, नंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांना समजलं.

मानसिक तणावातून आयुष्य संपवल्याचा आरोप

आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर संजना नैराश्यात होती. तरीही संजनाने आपला संसार कसातरी सावरण्याचा आणि टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र स्वयंपाक, कपडे परिधान करण्याची पद्धत आणि इतर गोष्टींवरून तिला सातत्याने हिणवलं जात होतं. सततचे टोमणे आणि किरकोळ कारणांवरून वाद यांना ती कंटाळली होती. याच मानसिक तणावातून तिनं टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरात आयुष्य संपवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. घटनेच्या आदल्या रात्री संजनाने आपल्या आईला फोन करून पती आणि सासरचे इतर सदस्य सतत टोमणे मारत असल्याचे सांगत हंबरडा फोडला होता. मी आज जेवणारही नाही,असे सांगत तिने हताश होऊन फोन ठेवला होता.

माहेरच्या मंडळींना अंधारात ठेवून रुग्णालयातून पळ

आरोपानुसार, दुसऱ्या दिवशी ​घराच्या वरच्या खोलीत संजनाने गळफास घेतल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला तात्काळ एका खाजगी रुग्णालयात नेले. दुपारी ४ वाजताच्या सुमारास जालनाहून माहेरचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले, रुग्णालयात पोहोचताच पतीसह सासरचे लोक तिथून निघून गेले. त्यानंतर घाटी रुग्णालयात देखील सासरचं कुणीच उपस्थित नव्हतं. त्यामुळे माहेरच्यांचा संताप वाढला. त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी करत बेगमपुरा पोलीस ठाण्यात मोठी गर्दी करत कठोर कारवाईची मागणी केली.पोलिसांनी संजनाचा मोबाईल जप्त केला असून अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >