Wednesday, October 14, 2026

Denmark Open : सिंधू अन् लक्ष्य सेन पहिल्याच फेरीत गारद; डेन्मार्क ओपनमध्ये भारताला मोठा झटका

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, किदाम्बी श्रीकांत आणि युवा बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा यांनी विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

ओडेन्से (डेन्मार्क) : डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून भारतासाठी एक अत्यंत निराशेची बातमी समोर आली आहे. भारताचे दिग्गज शटलर पी.व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांना पहिल्याच फेरीत दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. स्टार खेळाडूंच्या या खराब कामगिरीमुळे भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, याच स्पर्धेत अनुभवी खेळाडू किदाम्बी श्रीकांत आणि युवा स्टार तन्वी शर्मा यांनी चमकदार कामगिरी करत दुसऱ्या फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

सिंधू अन् लक्ष्यचे पॅकअप

दोनवेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पी.व्ही. सिंधूची या स्पर्धेतील सुरुवात अतिशय खराब ठरली. तिला जर्मनीच्या इव्होन लीकडून 13-21, 25-23, 19-20 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे, ली विरुद्धच्या मागील चार सामन्यांत सिंधूने नेहमी विजय मिळवला होता, मात्र या ऐतिहासिक लढतीत तिला पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. निर्णायक गेममध्ये 19-15 अशी मजबूत आघाडी असतानाही सिंधू विजयापासून मुकली.

दुसरीकडे, पुरुष एकेरीत भारताचा आघाडीचा शटलर लक्ष्य सेन याचेही आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. त्याला चायनीज तैपेईच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या चोऊ टिएन-चेनविरुद्ध 18-21, 21-13, 15-21 असा पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे, बीडब्ल्यूएफ (BWF) वर्ल्ड टूरवरील त्याच्या गेल्या सहा स्पर्धांपैकी पहिल्याच फेरीत बाहेर पडण्याची लक्ष्यची ही पाचवी वेळ ठरली आहे.

श्रीकांत आणि तन्वीकडून दिलासादायक कामगिरी

मोठ्या खेळाडूंच्या पराभवानंतर भारताच्या किदाम्बी श्रीकांतने मात्र मान उंचावण्यास भाग पाडले. 2017 च्या डेन्मार्क ओपनचा विजेता राहिलेल्या श्रीकांतने फ्रान्सच्या अर्नॉड मर्क्लेचा 22-20, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव करत पुढील फेरीत धडक मारली. याशिवाय, युवा खेळाडू तन्वी शर्माने जपानच्या नात्सुकी निदाइराचा 21-17, 16-21, 21-19 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच कायम ठेवली आहे. आता पुढील फेरीत तन्वी आणि इव्होन ली यांच्यात सामना रंगणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >