
हनुमान चालीसा म्हणण्याची अट ठेवावी
मुंबई : नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांत सहभागी होणाऱ्यांची ओळख तपासावी, तसेच ओळखपत्र दाखवण्यासह हनुमान चालीसा म्हणण्याची अट ठेवावी, अशी भूमिका राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी मांडली आहे. खोटी नावे सांगून गरब्यात प्रवेश करणे, महिलांची छेडछाड करणे किंवा ‘लव्ह जिहाद’चा कथित प्रयत्न करणे सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबई विशेष प्रतिनिधी झाडांना पाणी देताना शक्यतो पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा. त्याऐवजी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मधून प्रक्रिया केलेले, ...
नवरात्रोत्सव हा हिंदूंचा सण असून गरबा आणि दांडियाला हिंदू परंपरेत विशेष महत्त्व आहे, असे राणे यांनी सांगितले. या उत्सवात सहभागी होण्यासाठी नाव किंवा ओळख लपवून प्रवेश करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. नवरात्रोत्सवाच्या काळात ‘लव्ह जिहाद’च्या घटना वाढत असल्याचा आरोप करत त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला पाठिंबा दर्शवला.
‘पोलिसांच्या काठीचा दांडिया चालेल’
गरबा आणि दांडियाच्या ठिकाणी महिलांची छेडछाड करणाऱ्या किंवा अनुचित वर्तन करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे राणे म्हणाले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. गरब्याच्या ठिकाणी संशयास्पद ओळख घेऊन येणाऱ्यांवर हिंदुत्ववादी संघटनांचे लक्ष असेल, असेही त्यांनी सांगितले.
डीजेला परवानगी नसेल तर....
डीजेच्या वापराबाबत बोलताना राणे यांनी सर्व धर्मांच्या मिरवणुकांसाठी समान नियम लागू करण्याची मागणी केली. गणेशोत्सवात डीजेला परवानगी नसेल, तर ईदच्या मिरवणुकांनाही समान निर्बंध लागू केले पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे होते.
मलाडमधील गरबा-दांडियाच्या कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या फलकांबाबत विचारले असता, हिंदू इतर धर्मांच्या सणांमध्ये अडथळे निर्माण करत नाहीत, त्यामुळे हिंदूंच्या सणांमध्येही अडथळे आणू नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. राज्य सरकारची ‘लव्ह जिहाद’विरोधातील भूमिका स्पष्ट असल्याचेही राणे यांनी सांगितले.





