Saturday, November 28, 2026

Chandrashekhar Bawankule : काँग्रेसला डिलिमिटेशन विधेयकामुळे सुपडा साफ होण्याची भीती; बावनकुळेंचा घणाघात

नागपूर : काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे ते जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसचा एकमेव अजेंडा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणे हा आहे," अशी घणाघाती टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी डिलिमिटेशन विधेयक, शरद पवार गटाची भूमिका, देवस्थान जमीन कायदा आणि मौदा एनटीपीसी आंदोलनासह विविध मुद्द्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली आणि विरोधकांवर निशाणा साधला.

डिलिमिटेशन विधेयक आणि काँग्रेसवर टीका

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी डिलिमिटेशनमुळे संविधान धोक्यात येणार असल्याचा आरोप केला होता. याला प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला जगातील सर्वोत्तम देश बनवण्याच्या भूमिकेतून काम करत आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या आधारेच मतदारसंघ पुनर्रचनेची (डिलिमिटेशन) प्रक्रिया राबवली जात आहे. यामुळे खासदार आणि आमदारांची संख्या वाढेल, मतदारसंघाचे क्षेत्रफळ कमी झाल्याने लोकप्रतिनिधींना जनतेला अधिक चांगली सेवा देता येईल."

या विधेयकामुळे महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार असून, खऱ्या अर्थाने महिला भगिनींना सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. यामुळे आपला सुपडा साफ होईल आणि राहुल गांधी यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही, अशी भीती काँग्रेसला वाटत असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या अनेक खासदारांना या विधेयकाचे महत्त्व माहीत आहे, मात्र पक्षाच्या दबावामुळे ते मनाविरुद्ध मतदान करतील, असा दावाही बावनकुळेंनी केला. तसेच, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते या विधेयकाला समर्थन देतील, असेही ते म्हणाले.

शरद पवारांच्या भूमिकेवरून काँग्रेसला टोला

इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवार गट सहभागी झाला नसल्याच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. "जेव्हा काँग्रेसला सत्तेत यायचे होते, तेव्हा शरद पवार यांनी त्यांना मदत केली. त्यावेळी ते काँग्रेससाठी चांगले होते. आता या ऐतिहासिक विधेयकाला शरद पवार गटाने समर्थन देण्याची भूमिका घेतल्यामुळे ते काँग्रेससाठी वाईट ठरले आहेत. राहुल गांधी यांचे पंतप्रधान होण्याचे आणि विजय वडेट्टीवार यांचे २०१९ मध्ये मंत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्यामुळेच काँग्रेसकडून शरद पवारांवर टीका केली जात आहे," असे बावनकुळे म्हणाले.

देवस्थान इनाम जमीन कायदा आणि आदिवासींचे हक्क

राज्यातील देवस्थान इनाम जमिनींच्या संरक्षणाबाबत बोलताना महसूलमंत्र्यांनी सांगितले की, "सरकारने यासाठी देवस्थानांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे. त्यांच्याशी चर्चा करून नवीन कायदा तयार केला जात असून, यासाठी आवश्यक कायदेशीर अधिकार सभागृहात आणले जातील. देवस्थानांच्या जमिनींवर देवस्थानांचाच हक्क राहील आणि त्या कोणालाही बळकावता येणार नाहीत." यासोबतच, आदिवासी समाजाला वनपट्टे देण्यात आले असून, सातबारा आणि बारा-ईच्या माध्यमातून आणि विशेष मोहिमेद्वारे उर्वरित आदिवासी शेतकऱ्यांनाही जमिनीची मालकी मिळवून दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मौदा एनटीपीसी आंदोलन आणि ॲग्रो व्हिजन

मौदा येथील एनटीपीसी प्रकल्पातील बाधितांच्या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, "जमिनी संपादित झालेल्यांना नोकऱ्या मिळाव्यात आणि राखेच्या समस्येमुळे कुंभारी गावाचे पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी मी केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांची दोन वेळा भेट घेतली आहे. गावातील ५० टक्के नागरिकांना किडनी, यकृत आणि हृदयाशी संबंधित आजार असल्याचा दावा केला जात आहे. या प्रश्नावर पुन्हा एकदा खट्टर यांची भेट घेणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातूनही हा विषय केंद्र सरकारसमोर मांडला जाईल." दरम्यान, नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित केले जाणारे देशातील सर्वात मोठे 'ॲग्रो व्हिजन' प्रदर्शन हे लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवत असल्याचे गौरवोद्गारही बावनकुळे यांनी यावेळी काढले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >