
मुंबई: पुस्तक वाचनामुळे माणसाचे विचारविश्व समृद्ध होते, तसेच इतरांच्या अनुभवातून आणि विचारांतून शिकण्याची संधी मिळते. समाजात वाचनाची आवड वाढावी आणि वाचन संस्कृती अधिक व्यापक व्हावी, यासाठी शासन आणि विविध संस्था सातत्याने प्रयत्नशील आहेत. मुंबई पुस्तक महोत्सवाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा समाजातील वाचनाची वाढती आवड दर्शवितो, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मुंबई पुस्तक महोत्सवाला भेट देताना त्यांनी विविध पुस्तकांची पाहणी केली आणि पुस्तकांची खरेदीही केली.
मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पुस्तक महोत्सवातील विविध दालनांची पाहणी करत पुस्तकांच्या विश्वाचा अनुभव घेतला. या कार्यक्रमाला महोत्सवाचे मुख्य आयोजक आमदार अमित साटम, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी आणि मुख्य संरक्षक प्रा. मिलिंद मराठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आज मुंबई विद्यापीठ परिसरात आयोजित 'मुंबई पुस्तक महोत्सवाला' भेट देऊन पुस्तकप्रेमींचा उत्स्फूर्त उत्साह अनुभवला. याप्रसंगी भारत सरकारच्या सेंट्रल रेफरन्स लायब्ररीने तयार केलेल्या ‘राष्ट्रीय ग्रंथ सूची – मराठी विभाग’ या ग्रंथसूचीचे प्रकाशन माझ्या हस्ते पार पडले.
यावेळी महोत्सवातील विविध दालनांची पाहणी करत अरुण साधू लिखित ‘महाराष्ट्र’, कुलदीप चंद अग्निहोत्री लिखित ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर – यात्रा के पदचिन्ह’ आणि रघुवेंद्र तंवर लिखित ‘सरदार पटेल : एक सचित्र जीवनी’ या पुस्तकांची खरेदी केली. पुण्याप्रमाणेच मुंबईतही हा महोत्सव दरवर्षी भव्य स्वरूपात साजरा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आयोजकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महोत्सवाचे मुख्य आयोजक आमदार अमित साटम, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, मुंबई पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी, मुंबई पुस्तक महोत्सवाचे मुख्य संरक्षक प्रा. मिलिंद मराठे, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर आदी उपस्थित होते. 📍२८ नोव्हेंबर २०२६, मुंबई #MumbaiBookFestival #ReadingCulture #BookLovers #MumbaiUniversity #NationalBookTrust #MarathiLiterature #BooksEnrichLife @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra @AmeetSatam @pawantripathi_ @milindsmarathe — Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 28, 2026
वाचन संस्कृती वाढविण्यासाठी शासनाचे प्रयत्न
पुस्तकांच्या माध्यमातून अनेक विचारवंतांचे वर्षानुवर्षांचे चिंतन, संशोधन आणि अनुभव वाचकांना कमी वेळेत जाणून घेता येतात. पुस्तक वाचनामुळे व्यक्तीच्या विचारांना नवी दिशा मिळते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक होतो. त्यामुळे समाजात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी शासन आणि विविध संस्था वेगवेगळे उपक्रम राबवत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
नॅशनल बुक ट्रस्ट ही केंद्र सरकारची संस्था वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. पुस्तक महोत्सवांच्या माध्यमातून विद्यार्थी, लेखक, प्राध्यापक, वाचक आणि नागरिकांना एकाच ठिकाणी विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध होत आहेत. मुंबई पुस्तक महोत्सवातील गर्दी आणि पुस्तक खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह पाहून मुंबईकरांमध्ये वाचनाची आवड असल्याचे स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले.
पुणे पुस्तक महोत्सवाचाही उल्लेख
पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित पुस्तक महोत्सवाला सुरुवातीपासूनच वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी स्टॉल्सची संख्या आणि पुस्तक विक्रीत वाढ होत असून, यंदाही मोठ्या प्रमाणावर स्टॉल्स उभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्याला जागतिक स्तरावर पुस्तकांची राजधानी म्हणून मान्यता मिळण्याची संधी असल्याचेही त्यांनी व्यक्त केले.
मुंबईतही पुस्तक महोत्सवाचे आयोजन दरवर्षी मोठ्या प्रमाणावर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अशा उपक्रमांमुळे विद्यापीठ आणि विद्यार्थी पुस्तकांच्या विश्वाशी जोडले जातात, तसेच विद्यापीठाला नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळते.
मंत्र्यांनी कोणती पुस्तके खरेदी केली?
मुंबई पुस्तक महोत्सवाला भेट दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी काही पुस्तकांची खरेदी केली. यामध्ये अरुण साधू लिखित ‘महाराष्ट्र’, कुलदीप चंद अग्निहोत्री लिखित ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर – यात्रा के पदचिन्ह’ आणि रघुवेंद्र तंवर लिखित ‘सरदार पटेल : एक सचित्र जीवनी’ या पुस्तकांचा समावेश आहे.
यावेळी सेंट्रल रेफरन्स लायब्ररी, भारत सरकार यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय ग्रंथ सूची – मराठी विभाग’ या ग्रंथसूचीचे प्रकाशनही चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवाच्या आयोजकांचे अभिनंदन करत त्यांनी या उपक्रमाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






