Saturday, November 28, 2026

Nashik : पाणीकपातीचा निर्णय तूर्तास लांबणीवर !

मंत्री गिरीश महाजन ; पुढील आठवड्यात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक

Nashik : नाशिक शहरातील पाणीकपातीचे संकट कायम असले, तरी वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची अतिरिक्त पाण्याची गरज लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. महापालिकेने केलेल्या वाढीव पाणीमागणीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच पाणीकपातीचे स्वरूप निश्चित होईल, असे संकेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. यासंदर्भात पुढील आठवड्यात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असून, त्यानंतर पाणीकपातीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

महापालिकेत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी पाण्याच्या उपलब्धतेचा अद्याप सविस्तर आढावा घेतला नसल्याचे स्पष्ट केले. नाशिकची लोकसंख्या सातत्याने वाढत असून औद्योगिक क्षेत्राचाही विस्तार होत आहे. त्यामुळे भविष्यातील पाणी नियोजनात या बाबींचा विचार आवश्यक आहे. त्यातच सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे अतिरिक्त पाण्याची गरज भासणार आहे. महापालिकेने वाढीव पाण्याची मागणी केली असली, तरी सध्याच्या परिस्थितीत अतिरिक्त पाणी देणे शक्य नसल्याचे महाजन यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठीची आवर्तनेही निश्चित करायची असल्याने पाणीवाटपाचा समतोल साधावा लागणार आहे.

महापालिकेने २०२६-२७ या जलआरक्षण वर्षासाठी सुधारित प्रस्ताव सादर करून एकूण ८ हजार २८० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केली आहे. त्यात नियमित पाणीपुरवठ्यासाठी ७ हजार ६४५, तर सिंहस्थासाठी ६३५ दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता नमूद केली आहे. मात्र, यापूर्वीच ६ हजार ९७३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे वाढीव मागणी आणि उपलब्ध पाणीसाठा यातील तफावत भरून काढण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने उपलब्ध साठा टिकविण्याचीही चिंता आहे. बाष्पीभवन रोखणे तातडीने शक्य नसल्याचे सांगत महाजन यांनी पाणी नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. किकवी धरण प्रकल्पाबाबतही आठवडाभरात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यामुळे वाढीव पाणीमागणी, सिंचनाची आवर्तने आणि शहरातील पाणीकपात या तिन्ही मुद्द्यांवरील निर्णयाकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >