Wednesday, October 14, 2026

Pusad Accident : पुसद-दिग्रस मार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली येऊन स्कुटीवरील दोघांचा मृत्यू

या धडकेनंतर स्कुटीवरील दोघेही ट्रकच्या मागील चाकाखाली आले.

पुसद : पुसद-दिग्रस मार्गावरील पुस नदीच्या नवीन पुलावर ट्रक आणि स्कुटीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत स्कुटीवरून प्रवास करणाऱ्या 2 जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास विठाळा वार्ड परिसरातील पुलावर ही घटना घडली. अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

या अपघातात युसुफ शहा चांद शहा (वय अंदाजे 55) आणि यादव काळूराम टारफे (वय 28) यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघेही स्कुटीवरून पुसदच्या दिशेने जात होते. त्यावेळी ट्रक क्रमांक MH 37 T 0818 आणि स्कुटी क्रमांक MH 29 A 5132 यांच्यात धडक झाली. या धडकेनंतर स्कुटीवरील दोघेही ट्रकच्या मागील चाकाखाली आले.

अपघातात दोघांचा मृत्यू

या अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या जखमी व्यक्तीला वाचविण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले. त्याला तातडीने पुसद ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

नागरिकांची गर्दी; पोलिसांकडून वाहतूक सुरळीत

पुस नदीवरील नवीन पूल हा वर्दळीचा मार्ग असल्याने अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच पुसद शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा वाहतूक शाखेचे अनिल कांबळे आणि वाहतूक कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करीत आहेत. पोलीस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद शहर पोलीस चालकाचा शोध घेत असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >