
वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या सामन्यानंतर 2-2 अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे पाचव्या टी20 सामन्यात विजयी संघ मालिका खिशात घालणार आहे. चौथ्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि कर्णधार श्रेयस अय्यरला मनासारखा निर्णय घेता आला. त्याने खेळपट्टीचा अंदाज घेऊन प्रथम गोलंदाजी करणं पसंत केलं. या खेळपट्टीवर आरामात धावांचा पाठलाग करता येईल असं त्याला वाटलं. पण सर्व फासे उलटे पडले. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने सर्व अंदाज चुकीचे ठरवले आणि झंझावाती शतक ठोकलं. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 247 धावांचं बलाढ्य आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करणं काही भारतीय संघाला जमलं नाही. भारतीय संघ 223 धावांपर्यंत मजल मारू शकला आणि वेस्ट इंडिजने हा सामना 24 धावांनी जिंकला.
भारताचा डाव
भारताने 248 धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरूवात केली. पहिल्या विकेटसाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी 60 धावांची भागीदारी केली. यात संजू सॅमसनने 23 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. त्यानंतर इशान किशन काही खास करू शकला नाही. त्याला फक्त 6 धावा करता आल्या. तर श्रेयस अय्यरही 16 धावा करून तंबूत परतला. अभिषेक शर्माकडून फार अपेक्षा होत्या. मात्र त्याचा खेळही 29 धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजीला आलेला नमन धीर खातंही खोलू शकला नाही. तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. सहाव्या विकेटसाठी 32 चेंडूत 70 धावांची भागीदारी केली. पण ही जोडी फुटली आणि भारताचा पराभव निश्चित झाला. अक्षर पटेल 3, प्रिन्स यादव 0 आणि अर्शदीप सिंग 5 धावांवर असताना रिटायर्ड आऊट झाला.
भारत वेस्ट इंडिज मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने वेस्ट ...
वेस्ट इंडिजचा डाव
भारतीय गोलंदाजांना विंडीजच्या फलंदाजांनी अजिबात डोके वर काढू दिले नाही. कर्णधार आणि यष्टीरक्षक शाई होप याने अवघ्या 50 चेंडूत 4 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने नाबाद 102 धावांची शतकी खेळी केली. त्याला शेवटच्या षटकांमध्ये शेरफेन रदरफोर्डची उत्तम साथ लाभली. त्याने 26 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. याशिवाय शिमरॉन हेटमायरने अवघ्या 12 चेंडूत 33 धावांची खेळी केली, तर रोव्हमन पॉवेलने 24 आणि ज्युवेल अँड्र्यू 21 धावा करत योगदान दिले. भारताकडून अक्षर पटेल, प्रिन्स यादव आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. मात्र धावांचा ओघ रोखण्यात अपयशी ठरले.




