Wednesday, October 14, 2026

Metro 4 आणि 4 अ मार्गिकेच्या मेट्रोचं अनावरण, ठाणेकरांची अखेर प्रतिक्षा संपली; केव्हापासून घडणार मेट्रो सफर?

Thane Metro News: मेट्रो मार्गिका 4 आणि 4 अ वरील मेट्रोचं अनावरण करण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणेकरांची असलेली प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली आहे.

ठाणे: मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ संबंधित महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ठाणेकर गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत, अखेर तो क्षण आला आहे. ठाणे- वडाळा मार्गावर धावणाऱ्या मेट्रोला मेट्रो मार्गिका 4 म्हणून ओळखतात. मेट्रो मार्गिका 4 आणि 4 अच्या मेट्रोचा पहिला लूक रिव्हिल लूक करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये या मेट्रोच्या रॅकचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी एमएमआरडीएचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला.

अल्स्टोम इंडिया कंपनीकडून ह्या मेट्रोची निर्मिती करण्यात आली आहे. मेट्रोच्या संपूर्ण देखभालीचं काम हीच कंपनी करणार आहे. अत्याधुनिक सुविधा पुरवणारी ठाणे- वडाळा मार्गावरील ही मेट्रो 6 डब्ब्यांची असणार आहे. अद्याप मेट्रोच्या अत्याधुनिक सुविधांबद्दल मेट्रो प्रशासनाकडून सविस्तर माहिती मिळालेली नाही. वडाळा, घाटकोपर, मुलुंड, ठाणे आणि कासारवडवली मार्गावर चालवणारी मेट्रो ही मेट्रो 4 असणार आहे. या मार्गिकेवर एकूण 32 स्थानकं असतील. तर, मेट्रो 4 अ मार्गिकेवर कासारवडवली, गावनीवाडा आणि गायमुख असे तीन स्थानकं असतील. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेली ही मेट्रो मार्गिका येत्या काही दिवसांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाणेकरांना येत्या डिसेंबर महिन्यापासून मेट्रो प्रवास करता येणार, असल्याची माहिती दिली होती. शेअर केलेल्या पोस्टमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, "ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी! गायमुख ते कापूरबावडी या मेट्रो मार्गाची यशस्वी चाचणी पूर्ण झाली असून, डिसेंबरपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दिशेने ठोस पाऊल पडले आहे. या मार्गामुळे गायमुख, कासारवडवली, वाघबीळ, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कापूरबावडी आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास मदत होईल. ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी मेट्रोसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देणे ही काळाची गरज आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे."

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >