
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत वेसावे (वर्सोवा) येथे उभारण्यात येत असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राचे काम सुमारे ८० टक्के पूर्ण झाले आहे. हे प्रकल्प ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे वेसावे, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, जुहू आणि विलेपार्ले परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे. तसेच, वेसावे आणि पश्चिम उपनगरांतील जवळपासच्या किनारपट्टीच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा होणार आहे.
मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या ...
मुंबईतील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत वेसावे (वर्सोवा) येथे उभारण्यात येत असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राच्या प्रकल्पस्थळाला अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी भेट देऊन कामांची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पातील स्थापत्य, यांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी कामांचा आढावा घेतला. मलजल प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रक्रिया टाक्या, इनलेट व आउटलेट व्यवस्था, पंप हाऊस, स्लज प्रक्रिया युनिट, अंतर्गत पाइपलाइन तसेच अन्य स्थापत्य कामांच्या प्रगतीची त्यांनी पाहणी केली. यासोबतच पंप, एरेशन ब्लोअर्स, स्क्रीनिंग व स्लज प्रक्रिया यंत्रणा, विविध यांत्रिक उपकरणे आणि पाइपिंगच्या उभारणीचाही आढावा घेतला. प्रमुख अभियंता (मुंबई मलनि:सारण प्रकल्प) राजेंद्र परब यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दररोज १८० दशलक्ष लीटर मलजलावर प्रक्रिया
वेसावे येथील अस्तित्वातील खारक्षेत्रात हे मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्राची क्षमता दररोज सुमारे १८० दशलक्ष लीटर इतकी आहे. प्रकल्पाची संरचनाविषयक कामे पूर्ण झाली आहेत. या केंद्रामध्ये सांडपाण्यातील हानिकारक घटक आणि प्रदूषके दूर करण्यासाठी सिक्वेन्शियल बॅच रिऍक्टर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
कामे समांतर पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश
मलजलावर द्वितीय स्तरीय प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली द्रव प्रक्रिया व्यवस्था ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर संपूर्ण प्रकल्पाचे काम ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे. निर्धारित कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. सद्यस्थितीत प्रकल्पस्थळी दररोज सुमारे ३४० मनुष्यबळ कार्यरत आहे. प्रकल्पपूर्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मनुष्यबळाची संख्या ५०० पर्यंत वाढवावी. तसेच, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध ठेवून तीन सत्रांमध्ये काम सुरू ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. प्रकल्पाची सर्व कामे समांतर पद्धतीने आणि अधिक वेगाने पूर्ण करावीत. कामाच्या ठिकाणी गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देशही बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.






