
मुंबई : “उमर खालिदच्या समर्थनार्थ उभे राहणारे लोक आधी पाकिस्तानचे झेंडे फडकवत होते, ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणांसह जिहादला मदत करत होते. मात्र आता उमरच्या समर्थकांना तिरंग्याचा आधार घ्यावा लागत आहे. त्यातून तिरंग्याची आणि आमच्या हिंदुत्त्ववादी सरकारची ताकद दिसते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशभक्तीचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार विरोधकांना नाही”, असा हल्लाबोल राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केला.
सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. दरम्यान, शिवसेना आमदार बच्चू कडू यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता मंत्री राणे म्हणाले, त्यांच्या वारंवारच्या विधानांमुळे महायुतीतील वातावरण बिघडत असल्याचा अनुभव येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कडू किती वेळा अडचणीत आणणार, असा सवाल त्यांनी केला. कडू यांना जवळ घेतल्यामुळे भविष्यात वाईट अनुभव आले, असे म्हणण्याची वेळ एकनाथ शिंदे यांच्यावर येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साखरेचा एकही कण बाहेर जाऊ देणार नाही, तसेच उसाचे ट्रक आणि ट्रॅक्टर कारखान्यांमध्ये जाऊ देणार नाही, असा इशारा दिल्याबद्दल विचारले असता राणे म्हणाले, राजू शेट्टी यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यांचा अनुभव महाराष्ट्राला अनेक वर्षांपासून आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, तर तो दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रयत्न करेल. कारखाने बंद करण्यासह कोणतेही इशारे देण्याचा अधिकार संबंधितांना असला, तरी सरकारने त्यांची किती गांभीर्याने दखल घ्यायची, याचा विचार केला जाईल. शेतकरी आणि समाजातील प्रत्येक घटकाचे हित जपण्यासाठीच जनतेने महायुती सरकारला निवडून दिले असून, सरकार त्या दिशेने काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना मंत्री नितेश राणे म्हणाले, सुमारे एक ते सव्वा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत मदतीची रक्कम जमा होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. यापूर्वी वीजबिल माफी आणि कर्जमाफीसारखे निर्णयही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झाल्याचे ते म्हणाले. पाच हजार रुपयांची मदत तुटपुंजी असल्याची टीका करणाऱ्यांनी यापूर्वी शेतकऱ्यांसाठी काय केले, याचा हिशेब द्यावा, असे आव्हान राणे यांनी विरोधकांना दिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर टीका करणाऱ्यांनी कर्नाटकात इतकी कमी मदत का दिली जाते, याचे उत्तर द्यावे, असे ते म्हणाले. शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यासह विरोधकांनी या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
महाराष्ट्रात देण्यात येणारी पाच हजार रुपयांची मदत ही सुरुवात असून, पुढील मदत पॅकेजमध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून आणखी मदत केली जाणार असल्याचे राणे यांनी सांगितले. आपण या उपसमितीचा भाग असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वसमावेशक मदतीचे निर्देश दिल्याचे ते म्हणाले. चारा आणि पाण्याच्या प्रश्नांसह दुष्काळाशी संबंधित विविध बाबींमध्ये सरकार मदत करणार असून, या प्रक्रियेत हात आखडता घेतला जाणार नाही. चांगल्या निर्णयाचे कौतुक करणे हा माणुसकीचा धर्म असल्याचे सांगत, विरोधकांनी राजकारणापलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या मदतीचे स्वागत करावे, असे आवाहन त्यांनी केले.
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टामध्ये तरूणांना नोकरी करण्याची संधी आहे. वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी सुप्रीम कोर्टामध्ये नोकरभरती केली जाणार आहे. त्यामुळे ...
आदित्य ठाकरे दिवाळीचे फटाके तुरुंगात फोडणार
दरम्यान, संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हा शेवटचा दसरा असल्याची टीका केली होती. त्याचा समाचार घेताना मंत्री नितेश राणे म्हणाले, आदित्य ठाकरे यांची ही शेवटची दिवाळी असल्याचे आपल्यालाही ऐकायला मिळाले आहे. संजय राऊत यांनी दिलेल्या राजकीय भाकितांपैकी कोणती तारीख खरी ठरली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच आदित्य ठाकरे दिवाळीचे फटाके तिहार तुरुंगात फोडणार की मातोश्रीवर, याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले.





