Saturday, November 28, 2026

'भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील नवा सुवर्णअध्याय' , मतदारसंघ पुनर्रचनेला एकनाथ शिंदेंचा पाठिंबा

नारी शक्ती वंदन कायद्यांतर्गत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्याचे समर्थन, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे केले कौतुक

मुंबई : मतदारसंघांची पुनर्रचना ही भारतीय लोकशाही अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी काळाची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. या पुनर्रचनेमुळे प्रत्येक राज्यातील जागांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ होणार असून, कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यासंदर्भात शिंदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली. मतदारसंघांचा आकार सुटसुटीत झाल्यास लोकप्रतिनिधींना तळागाळातील नागरिकांपर्यंत थेट पोहोचणे शक्य होईल. त्यामुळे विकासकामांचा वेग वाढण्यास मदत होईल, असे शिंदे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेतून 'नारी शक्ती वंदन कायद्या'अंतर्गत महिलांना ३३ टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. संसदेत महिलांना त्यांचा हक्काचा आवाज मिळणे ही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उचललेले हे पाऊल केवळ राजकीय निर्णय नसून महिला सक्षमीकरण आणि देशाच्या प्रगतीला दिशा देणारी क्रांती असल्याचे शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे तसेच, संकुचित राजकारण आणि पक्षीय मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रहिताला प्राधान्य देत या ऐतिहासिक निर्णयाला सर्वांनी एकमताने साथ द्यावी, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा