Tuesday, October 20, 2026

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी, चिंता करू नका; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसैनिक उभा असल्याचं सांगितलं. तसेच चिंता करू नका असा शब्दही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

राज्यात दुष्काळग्रस्त स्थिती असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे. तसेच सत्तेत असलेल्या भाजपा आणि शिवसेना पक्षाकडूनही मदतीचा ओघ सुरू आहे. असं असताना दसऱ्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात? याकडे लक्ष लागून होतं. यावेळी त्यांनी भाषणात शेतकऱ्यांचा व्यथा मांडल्या. तसेच शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार आणि आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असा शब्द दिला. यावेळी बांधावर गेल्यावर शेतकऱ्यांच्या व्यथा काय होत्या? तिथली परिस्थिती काय होती? याबाबत त्यांनी सांगितलं. तसेच शेतकऱ्यांना मदतीचा ओघ सुरू केला आहे. तसेच त्यांची दिवाळी काळी होणार नाही, याची काळजी घेतली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज आपला लाडका शेतकरी संकटात आहे. महाराष्ट्रात दुष्काळाच्या सावटाखाली आहे. सगळ्या दुष्काळग्रस्त भागातील कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत की आपआपल्या भागात थांबून शेतकऱ्यांना मदत करायची आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली. त्यात सर्व काही वाहून गेलं. पण त्यावेळीही आपला शिवसैनिक शेतकऱ्यांच्या पाठी उभा राहिला. म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही येथे येऊ नका शेतकऱ्यांना मदत करा. या वर्षी दुर्दैवाने पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. यावेळीही आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. मुख्यमंत्र्यांसह आम्ही सर्व गेलो आणि शेतकऱ्यांची व्यथा समजून घेतल्या. ही वेळ आरोप प्रत्यारोपाची नाही . ही वेळ राजकारणाची नाही. ही वेळ शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे. भगवा घेऊन खांद्यावर शेतकरी दिसेल बांधावर या घोषणेसह आपण शेतकऱ्यांसाठी काम करणार आहोत. शिवसैनिक खाली हाताने जाणार नाही. शेतकऱ्यांचं पोरगं आहे. आम्हाला शेतकऱ्यांच्या वेदना आणि दुख माहिती आहे. म्हणून सकाळीच दिवाळीचा 100 ट्रक शिधा रवाना केला आहे. आता दुष्काळी भागात त्याचं वाटप होईल. दुसरी फेरी होईल, तिसरी फेरी होईल.

'शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही'

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा व्यथा मांडताना सांगितलं की, माझ्या शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. जेव्हा आम्ही बांधावर गेलो, तेव्हा शेतकरी रडत होते. त्यांनी धीर सोडला. आता कसं जगायचं सांगत होते. आमच्या समोर दुसरा काही पर्याय नाही असं सांगत होते. शिक्षण कसं होईल, लग्नाचं कसं काय होईल? आम्ही त्यांना सांगितलं मी आलो आहे. चिंता करू नका. एकनाथ शिंदे शब्द पाळणारा आहे. मुलाचं शिक्षण असेल, लग्नाची चिंता असेल, त्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. शेतकऱ्यांना सांगितलं आहे की धीर सोडू नको आणि टोकाचं पाऊल उचलू नको. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेब असते तर ते देखील म्हणाले असते सण उत्सव बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यांच्या मदतीला जा. म्हणून आपण तेच करत आहोत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >