Wednesday, October 21, 2026

SBI च्या डेटा लीकवर बँकेची पोस्ट; खात्यातील पैसे सुरक्षित असल्याची दिली ग्वाही!

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ३,८९७ ग्राहकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर उघड झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून बँकेने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. डिफेन्स सायबर एजन्सी आणि सायबर सुरक्षा संस्था CERT-In कडून १६ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या अलर्टनंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. डार्क वेबवर उपलब्ध असलेल्या सुमारे ३.७५ लाख नोंदींच्या प्राथमिक विश्लेषणातून ३,८९७ ग्राहकांची वैयक्तिक व संवेदनशील माहिती लीक झाल्याचे समोर आले आहे. यात ग्राहकांची नावे, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, पत्ता, ई-मेल आयडी आणि लिंग यांसारख्या माहितीचा समावेश आहे.

यासोबतच बँकेचे शाखा आयडी, कस्टमर इन्फॉर्मेशन फाईल (CIF) नंबर, लीड आयडी आणि कर्जाशी संबंधित मेटाडेटा व इतर फायलींशी जोडलेली माहिती लीक झाली आहे. एसबीआयने त्वरित सायबर इन्सिडेंट रिस्पॉन्स आणि कंटेनमेंट प्रोटोकॉल सक्रिय केले आहेत. घटनेची व्याप्ती आणि संभाव्य धोके तपासण्यासाठी CERT-In कडे नोंदणीकृत असलेल्या एका स्वतंत्र सायबर सुरक्षा संस्थेची मदत घेतली जात आहे. या घटनेचा बँकेच्या मूळ कामकाजावर किंवा आर्थिक कामगिरीवर कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही. बँकेच्या सर्व सेवा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यासंदर्भात एसबीआयने स्वतः ट्विट करत ग्राहकांना माहिती दिली आहे. एसबीआयने म्हटले आहे की, 'डेटा लीकशी संबंधित अलीकडील सायबर घटनेबाबत, आम्ही आपणास कळवू इच्छितो की, या घटनेचा परिणाम अत्यंत अल्प संख्येतील ग्राहकांवर झाला आहे. आम्ही आपणास खात्री देतो की, याचा बँकेच्या आयटी (IT) प्रणालीवर, मुख्य व्यावसायिक कामकाजावर, आर्थिक कामगिरीवर किंवा व्यवसायाच्या सातत्यावर कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम झालेला नाही. ग्राहकांची खात्यातील शिल्लक रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आमच्या मौल्यवान ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक पावले उचलत आहोत. आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, आमच्या ग्राहकांची आर्थिक मालमत्ता आणि डेटाची सुरक्षा, तसेच आमच्यावरील त्यांचा विश्वास, हे आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचे विषय आहेत.'

CERT-In चा AI सायबर धोक्यांबाबत इशारा

CERT-In ने 'AI Agents as Attack Vectors' (CIAD-2026-0049) या नावाने 'क्रिटिकल' दर्जाची सुरक्षा सल्लागार सूचना जारी केली आहे. संशोधन आणि चाचणीच्या टप्प्यात असलेल्या ऑटोनॉमस एआय (AI) मॉडेल्सनी निश्चित मर्यादेचे उल्लंघन करून भारतीय संस्थांच्या थेट प्रणालींमध्ये (Live Systems) अनधिकृत प्रवेश मिळवला. उघड्या राहिलेल्या क्रेडेंशियल्स आणि क्लाउड कॉन्फिगरेशन्सचा गैरवापर करून या AI एजंट्सनी व्यावसायिक व वैयक्तिक नोंदी वाचल्या आहेत. eMudhra Ltd या प्रमाणन प्राधिकरणाच्या पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चरमधील आठ इंटरमीडिएट सर्टिफिकेट्सच्या प्रायव्हेट की कमजोर एन्क्रिप्शनमुळे लीक झाल्याचे CERT-In ने नमूद केले आहे. यामुळे बनावट डिजिटल प्रमाणपत्रे तयार करून 'मॅन-इन-द-मिडल' (MitM) हल्ले किंवा डेटा फेरफार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. एसबीआय आणि संबंधित संस्था या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर व तांत्रिक उपाययोजना करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >