Friday, October 23, 2026

Nitesh Rane: मच्छीमार बांधवांच्या मदतीसाठी सरकार पुढे, मंत्री नितेश राणे यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या

संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळामध्ये होरपळून निघत आहे. महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली असताना शेतकऱ्यांसह मच्छीमार बांधवांना सरकारकडून मदत केली जात आहे.

अहिल्यानगर: संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळामध्ये होरपळून निघत आहे. महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली असताना शेतकऱ्यांसह मच्छीमार बांधवांना सरकारकडून मदत केली जात आहे. आता अशातच अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मच्छीमार बांधवांना दिलासा देण्यासाठी तलावातील गाळ काढण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. शिवाय, आवश्यक मत्स्यबीजाची मागणी निश्चित करून त्यानुसार नियोजन करावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यामध्ये असलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये राज्य सरकार मच्छीमार बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्रालयाकडून मच्छिमार बांधवांना मदतीचा हात पुढे आल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील गावातील अनेक मच्छिमार बांधवांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सरकारकडून मदत मिळत असल्यामुळे अनेक मच्छिमार महिला आणि पुरूषांनी मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.

दरम्यान, आज मंत्री नितेश राणे अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील गावामध्ये पाहणी केली. यावेळी मंत्री नितेश राणे यांच्यासह अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनीही त्यांच्यासोबत तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तलावातील पाणीसाठ्याची सद्यःस्थिती जाणून घेतली तसेच मच्छीमार बांधवांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि मागण्या समजून घेतल्या. 2025- 26 या आर्थिक वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि 2026- 27 या चालू आर्थिक वर्षातील दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील मच्छीमार बांधव दुहेरी संकटात सापडले आहेत.

 

अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि त्यानंतर निर्माण झालेल्या अवर्षणाच्या परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील विविध संस्थांच्या ताब्यात असलेले तलाव कोरडे पडत चालल्याने मत्स्यपालनासमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. परिणामी, मत्स्यबीज संचयन, माशांची वाढ आणि उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊन मच्छीमार संस्थांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तलावांतील गाळ काढण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण झाल्यास मच्छीमार संस्थांना आगामी काळात मत्स्यपालनासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे या कामांना गती देण्याची आवश्यकता मंत्री नितेश राणे यांनी अधोरेखित केली. त्याचबरोबर किती मत्स्यबीजाची आवश्यकता आहे, याची माहिती संकलित करून मागणी सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमार बांधवांच्या अडचणी लक्षात घेऊन आवश्यक नियोजन करण्यावरही त्यांनी भर दिला. या पाहणी आणि संवादामुळे जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाई, मत्स्यबीज संचयन आणि आर्थिक नुकसानीच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले आहे. यावेळी मच्छीमारबांधवांनी आपल्या अडचणी मांडताना सन 2025- 26 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या संस्थांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. मत्स्यबीज संचयनासाठी करण्यात आलेला खर्च तसेच माशांचे झालेले नुकसान याबाबत भरपाई मिळावी, अशी अपेक्षा मच्छीमारांनी व्यक्त केली. ज्या तलावांमध्ये अद्याप काही प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे, तो माशांच्या वाढीसाठी उपलब्ध राहावा आणि पाटबंधारे विभागाने तो राखीव ठेवण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

मच्छीमार बांधवांच्या अडचणी लक्षात घेताना मंत्री नितेश राणे यांच्यासोबत, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त भानुदास पालवे, प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, नाशिक- संजय पाटील, प्रभारी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, अहिल्यानगर- दिनेश धोपे, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी ऋषिकेश ठाकरे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, नाशिक- अमित स्वामी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अमोल शेळके, जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघाचे अध्यक्ष शरद बाचकर तसेच मच्छीमार बांधव उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >