
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामन्यात भारताने विजय मिळवला असून 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे उर्वरित तीन सामन्यात भारताकडे मालिका विजयाची संधी आहे. भारताने तीन पैकी एका सामन्यात विजय मिळवला की मालिका खिशात घालणार आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडसाठी प्रत्येक सामना करो या मरोची स्थिती असणार आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा श्रेयस अय्यरच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 180 धावा केल्या आणि विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं. भारताने एक चेंडू आणि 4 विकेट राखून हा सामना जिंकला. या विजयात तिलक वर्माचं अर्धशतक महत्त्वाचं ठरलं. शेवटपर्यंत उभा राहून त्याने सामना विजयाच्या वेशीवर आणला.
भारताचा डाव
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 180 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात काही चांगली झाली नाही. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल स्वस्तात बाद झाले. पण नमन धीर, नितीश कुमार रेड्डी आणि तिलक वर्माने डाव सावरला आणि भारताला विजय मिळवून दिला. संजू सॅमसन 14, अभिषेक शर्मा 27, वैभव सूर्यवंशी 4, श्रेयस अय्यर 7 आणि अक्षर पटेल 11 धावा करून बाद झाले. या सामन्यात नमन धीरचं योगदान महत्त्वाचं ठरलं. त्याने 17 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकार मारत 31 धावा केल्या आणि बाद झाला. त्यानंतर उपकर्णधार तिलक वर्माने डाव सावरला. त्याला नितीश कुमार रेड्डीची साथ मिळाली. तिलक वर्माने 26 चेंडूत 6 चौकार आणि एक षटकार मारत नाबाद 51 धावा केल्या. तर नितीश कुमार रेड्डीने 13 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 26 धावांची खेळी केली.
न्यूझीलंडने दुसऱ्या टी20 सामन्यात विजयासाठी 180 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात काही खास झाली नाही. पॉवरप्लेमध्ये ...
न्यूझीलंडचा डाव
भारताला विजयासाठी धावा देताना न्यूझीलंडची सुरूवात काही चांगली झाली नाही. टिम सैफर्ट, फिन एलन आणि डेरिल मिचेल स्वस्तात बाद झाले. पॉवर प्लेमध्ये 43 धावांवर न्यूझीलंडने तीन विकेट गमावल्या होत्या. टिम सैफर्ट 7, फिन एलन 16 आणि डेरिल मिचेल 6 धावा करून बाद झाले. पण संघाची नाजूक स्थिती असताना ग्लेन फिलिप्स आणि बेवॉन जेकब्सने डाव सावरला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 76 चेंडूत 116 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे न्यूझीलंडला 150 पार धावांचा पल्ला गाठता आला. ग्लेन फिलिप्स 70 धावा करून तंबूत परतला. तर बेवॉन जेकब्स 58 धावांवर बाद झाला. तर मिचेल सँटनर नाबाद 4 आणि मायक ब्रेसवेल नाबाद 10 धावांवर तंबूत परतले. भारताकडून अर्शदीप सिंगने 2, भुवनेश्वर कुमार, प्रिन्स यादव आणि नितीश कुमार रेड्डीने प्रत्येकी 1 विकेट काढली.





