Sunday, October 25, 2026

Kojagari Special Masala Milk: केशर, बदाम अन् वेलचीचा सुगंध! असं बनवा कोजागरीचं खास दूध

कोजागरी पौर्णिमा म्हटलं की चंद्रप्रकाशात गप्पा आणि मसालेदार दुधाची मेजवानी आलीच! या खास रात्री केशर, बदाम, पिस्ता आणि वेलची घातलेल्या दुधाचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच असते. तुम्हालाही घरच्या घरी चविष्ट आणि सुगंधी कोजागरीचं दूध बनवायचं आहे का? मग जाणून घ्या साहित्यापासून ते बनवण्याच्या सोप्या पद्धतीपर्यंत सर्व माहिती!

कोजागरी पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक अत्यंत उत्साहाचा आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी प्रामुख्याने लक्ष्मी माता आणि चंद्र देवाची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की यादिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि "को जागर्ति?" म्हणजेच कोण जागे आहे का? असे विचारून जागृत असणाऱ्यांना धन-धान्य आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. या रात्री चंद्र आपलया सोळा कलांनी पूर्ण होऊन पृथ्वीवर अमृतवर्षाव करतो, असे मानले जाते. त्यामुळे लोक घराची सजावट करतात, अंगणात किंवा गच्चीवर रांगोळी काढतात आणि रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. या दिवशी चंद्राच्या प्रकाशात केशर, बदाम, पिस्ता आणि चारोळी टाकून आटवलेले मसाला दूध ठेवले जाते. चंद्राची किरणे या दुधात पडल्याने त्यात औषधी गुणधर्म येतात, अशी श्रद्धा आहे. त्यानंतर रात्रीच्या आरत्या, भजन-कीर्तनाचे आयोजन करून मध्यरात्री ते दूध प्रसाद म्हणून एकत्र पिण्याची परंपरा आहे.(MASALA MILK)

कोजागरीला स्वादिष्ट मसाले दूध कसे बनवायचे? हे जाणून घ्या...

लागणारे साहित्य:

• दूध: 1 लिटर (फुल फॅट / घट्ट दूध) • साखर: 4 ते 5 मोठे चमचे किंवा चवीनुसार (सुमारे १५० ग्रॅम) • केशर: 8 ते 10 धागे • वेलची पूड: अर्धा ते 1 छोटा चमचा • जायफळ पूड: चिमूटभर • हळद: 2 चिमूट (नैसर्गिक पिवळ्या रंगासाठी, पर्यायी) • सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ते): प्रत्येकी 8 ते 10 (बारीक चिरलेले) • घरगुती दूध मसाला पावडर: 2 ते 3 मोठे चमचे

कृती:

1. दूध आटवून घेणे: • एका मोठ्या आणि पसरट भांड्यात (कढईत) 1 लिटर दूध उकळायला ठेवा. • गॅस मध्यम ठेवून दूध चांगले उकळून घ्या आणि थोडे आटवून घ्या जेणेकरून दुधाला छान दाटसरपणा येईल. 2. केशर व साखर भिजवणे: • दुधाला उकळी येईपर्यंत, एका लहान वाटीत 2 चमचे कोमट दूध घेऊन त्यात केशराचे धागे भिजत ठेवा. 3. मसाला व सुकामेवा घालणे: • दुधात चवीनुसार साखर घालून ती विरघळेपर्यंत ढवळून घ्या. • त्यानंतर त्यात तयार केलेली दूध मसाला पावडर, बारीक चिरलेला सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ते), वेलची पूड, जायफळ पूड आणि चिमूटभर हळद टाका. • भिजवलेले केशरसुद्धा या दुधात ओतून घ्या. 4. शिजवणे: • सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या आणि मंद गॅसवर 5 ते 7 मिनिटे चांगले उकळू द्या जेणेकरून मसाला दुधात मिसळेल. 5. सर्व्ह करणे: • गॅस बंद करा. तयार झालेले गरमागरम किंवा थंडगार मसाला दूध ग्लासात ओतून त्यावर थोडे बदाम-पिस्त्याचे काप आणि केशराच्या काड्यांनी सजवून सर्व्ह करा.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा