Monday, October 26, 2026

WTC 2027: ऑस्ट्रेलिया दक्षिण अफ्रिका तिसऱ्या कसोटी सामन्यातील निकाल न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा! भारतावर असा होणार परिणाम

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोण जागा मिळवणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या शर्यतीत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका, बांगलादेश आणि भारत हे संघ आहेत. चला जाणून घेऊयात ऑस्ट्रेलिया दक्षिण अफ्रिका तिसऱ्या कसोटी सामन्याचा काय परिणाम होईल ते..

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी आता चुरशीची लढाई आहे. या स्पर्धेत एकूण नऊ संघ होते. त्यापैकी इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान हे संघ स्पर्धेतून आऊट झाले आहेत. तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका, बांगलादेश, भारत आणि श्रीलंकेला अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. त्यातल्या त्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेकडे मोठी संधी आहे. 11 कसोटी मालिका होणं अजूनही शिल्लक आहेत. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित वेगाने बदलणार आहे. असं असताना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा परिणाम गुणतालिकेवर होणार आहे. या सामन्यातील निकालामुळे न्यूझीलंडला गुणतालिकेत फायदा होण्याची शक्यता आहे. तर भारताचं अंतिम फेरीचं गणितही या सामन्याच्या निकालामुळे बदलणार आहे. नेमकं काय फायदा आणि काय तोटा होणार हे समजून घेऊयात...

ऑस्ट्रेलिया-दक्षिण अफ्रिका सामन्याने न्यूझीलंडला काय फायदा?

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील दोन सामन्यानंतर 1-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना जिंकणारा संघ मालिका खिशात घालेल. पण हा सामना ड्रॉ झाला, तर मालिका बरोबरीत सुटेल. सामन्याचा काही निकाल लागला तर गुणतालिकेत उलथापालथ होणार आहे. न्यूझीलंडला या सामन्याच्या निकालामुळे लाभ मिळू शकतो. तिसरा कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेने जिंकला तर न्यूझीलंडचा संघ 72.22 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर जाईल. 71.43 विजयी टक्केवारीसह दक्षिण अफ्रिका दुसऱ्या स्थानावर, तर 69.23 विजयी टक्केवारीसह ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या स्थानावर राहील.

ऑस्ट्रेलिया दक्षिण अफ्रिका सामना ड्रॉ झाला तरी न्यूझीलंडला लाभ मिळणार आहे. न्यूझीलंडचा संघ 72.22 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर असेल. तर ऑस्ट्रेलियाचा संघ 71.79 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या आमि दक्षिण अफ्रिका 61.90 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर राहिल. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर मात्र पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलिया राहिल. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 76.92 राहिल. तर न्यूझीलंडचा संघ 72.22 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या स्थानी राहिल. दुसरीकडे, दक्षिणअफ्रिकेच्या विजयी टक्केवारी कमालीची घसरण होऊन 57.14 इतकी राहील.

भारताला कशी मिळेल संधी?

भारतीय संघ 51.52 विजयी टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे. भारताची सध्याची स्थिती पाहता पहिलं स्थान गाठणं कठीण आहे. पण दुसरं स्थान गाठू शकते. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा संघ पराभूत होणं भारताच्या पथ्यावर पडू शकतो. कारण भारताची पुढची मालिका न्यूझीलंडविरुद्ध आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने न्यूझीलंडला क्लिन स्विप दिला तर भारतीय संघ 58.97 टक्क्यांसह दुसरं स्थान गाठेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >