
काही दिवसांपूर्वी उज्जैनच्या (Ujjain Temple) महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका भक्ताची हरवलेली चप्पल शोधून देण्यासाठी ChatGPT ने मदत केल्याची बातमी चर्चेत आली होती. आता तंत्रज्ञानाच्या या नव्या अवताराचा आणखी एक अद्भूत प्रकार समोर आला आहे. एकाव्यक्तीचा बांधका माच्या खडीत हरवलेला अत्यंत बारीक इअरबड (Earbud) शोधून काढण्याचे अशक्य काम ChatGPT ने अवघ्या ५ मिनिटांत करून दाखवले आहे. एआय (AI) तंत्रज्ञानाची ही प्रखर नजर पाहून सध्या सोशल मीडियावर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
नक्की काय घडली घटना ?
ही घटना घडली एका पार्कमध्ये. एक व्यक्ती आपल्या लहान मुलासोबत पार्कमध्ये फिरायला गेली होती. तिथून घरी परतताना मुलाच्या मागे धावताना या व्यक्तीच्या हुडीच्या (Hoodie) खिशातून इअरबडची केस (Case) खाली पडली आणि त्यातील डाव्या कानाचा पांढऱ्या रंगाचा इअरबड बाहेर निघून खडीच्या ढिगाऱ्यात जाऊन पडला. संध्याकाळची वेळ असल्याने हळूहळू अंधारही पडत होता. खडीच्या बारीक खडकांमध्ये छोटासा पांढरा इअरबड शोधणे अत्यंत कठीण झाले होते. त्या व्यक्तीने स्वतः १० मिनिटे शोधाशोध केली, परंतु इअरबड काही सापडला नाही.
आयडियाची कल्पना आणि ChatGPT ची कमाल
ChatGPT found my lost earbud by u/Just_a_fungi893 in ChatGPT
अखेर कसलाही मार्ग न दिसल्याने त्या व्यक्तीला एक भन्नाट कल्पना सुचली. त्याने खडी पसरलेल्या संपूर्ण जागेचे मोबाईलमधून काही फोटो काढले आणि ते थेट ChatGPT ला पाठवले. फोटो पाहिल्यानंतर ChatGPT ने त्याला आणखी जवळून आणि झूम करून फोटो पाठवण्याची सूचना केली. त्या व्यक्तीने एकापाठोपाठ तीन फोटो पाठवले. तिसऱ्या फोटोचे विश्लेषण करून ChatGPT ने लाल रंगाच्या लहान झुडुपाजवळ पडलेला पांढरा इअरबड अचूक शोधून दाखवला. केवळ जागेची माहिती न देता इअरबड कुठे पडला आहे, त्यावर लाल रंगाचे गोल वर्तुळ (Red Circle) करून फोटो परत पाठवला. यामुळे अवघ्या ५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत तो इअरबड त्या व्यक्तीला सुरक्षित मिळाला.
रेडिटवर पोस्ट आणि नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
त्या व्यक्तीने हा संपूर्ण अनुभव, त्याने दिलेले प्रॉमप्ट्स (Commands) आणि फोटोंचा पुरावा 'रेडिट' (Reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. हा प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्सचा वर्षाव केला आहे, "आता घरात हरवलेल्या चाव्या, टीव्हीचा रिमोट आणि मोजे (Socks) शोधण्यासाठीसुद्धा बहुदा एआयचीच मदत घ्यावी लागणार! "गुप्तहेरांच्या (Detective) चित्रपटांत दाखवले जाणारे डिटेक्टिव्हसुद्धा आता AI च्या तीक्ष्ण नजरेसमोर फिके पडतील." कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आता केवळ ऑफिसची कामे किंवा कोडिंगपुरती मर्यादित राहिलेली नसून, आपल्या दैनंदिन आयुष्यातील अशा लहान-सहान समस्या सोडवण्यासाठीही अत्यंत उपयुक्त ठरत आहे.







