Tuesday, October 27, 2026

Railway Travel Insurance: ऑनलाईननंतर आता रेल्वे आरक्षण काउंटरवरही प्रवास विम्याची सुविधा, केव्हापासून प्रवाशांना मिळणार लाभ?

ऑनलाईन तिकिट सुविधेसोबतच आता रेल्वे आरक्षण काउंटरवरही प्रवाशांना प्रवास विम्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई: अनेकदा रेल्वेतून प्रवास करताना अपघाताच्या घटना घडतात. रेल्वेवर दरड कोसळण्याची घटना, रेल्वेच्या डब्ब्याला आग लागल्याची घटना, काही कारणास्तव रेल्वे अपघात किंवा इतरत्र आणखीन कारणांमुळे अपघाताच्या घटना घडतात. या घटनांमुळे प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागतो. पण जर तुम्ही तिकिट बुक करताना प्रवास विमा काढला असेल, तर तुम्हाला कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही. मध्य रेल्वेने, प्रवाशांसाठी 'ऐच्छिक प्रवास विमा योजना' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय रेल्वेने आजपासून 27 ऑक्टोबर 2026 पासून, प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) केंद्रांवरून आरक्षित तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी 'ऐच्छिक प्रवास विमा योजना' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा पूर्वी, IRCTC च्या माध्यमातून ई- तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे, ती आता सर्व रेल्वे आरक्षण केंद्रांवरून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांसाठीही उपलब्ध असेल. या योजनेअंतर्गत, प्रवाशांना आपला मोबाईल क्रमांक देऊन आणि केवळ डिजिटल पेमेंटद्वारे विम्याचे शुल्क (प्रीमियम) भरून स्वेच्छेने प्रवास विमा घेऊ शकणार आहेत.

सध्याच्या योजनेनुसार, प्रति प्रवासी विम्याचे शुल्क 45 रूपये इतकी किंमत आहे. रेल्वे अपघात किंवा अनुचित घटनेमुळे जर प्रवाशाचा मृत्यू झाला तर, प्रवाशाला 10 लाख रुपये मिळणार आहेत. जर प्रवाशाला रेल्वे अपघातात कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आलं तर, 10 लाख रुपये मिळणार आहेत. कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आले तर, प्रवाशाला 7.5 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळणार आहेत. दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यासाठी लागणाऱ्या खर्चापैकी रेल्वेकडून प्रवाशाला 2 लाख रुपयांपर्यंतचा खर्च मिळणार आहे. जर कोणत्याही रेल्वे अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाला तर, त्याच्या मृतदेह वाहतुकीचा खर्च सुद्धा रेल्वेकडून देण्यात येणार आहे. रेल्वेकडून मृतदेह नेण्यासाठी 10,000 रुपये मिळणार आहेत. प्रवाशांना असे विमा संरक्षण मिळणार आहेत.

हे विमा संरक्षण, IRCTC ई- तिकीट प्रवाशांसाठी लागू असलेल्या 'ऐच्छिक प्रवास विमा योजने'च्या विद्यमान अटी आणि शर्तींनुसार असेल. जे प्रवासी विमा घेण्याचा पर्याय निवडतील, त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पॉलिसीचा तपशील मिळेल. आरक्षण केंद्रावरील कर्मचारी प्रवाशांना हा पर्याय निवडण्यास मदत करतील, तसेच विम्याचे शुल्क योग्यरित्या जमा करून प्रवाशांची माहिती नोंदवतील. मध्य रेल्वे, आरक्षण केंद्रांवरून तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना या ऐच्छिक विमा सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करते. अत्यंत अल्प शुल्कात उपलब्ध असलेली ही सुविधा रेल्वे प्रवासादरम्यान अतिरिक्त आर्थिक सुरक्षा प्रदान करते. मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सोयीसुविधांसाठी आणि कल्याणासाठी विविध प्रवासी-स्नेही उपक्रम राबवण्यास कटिबद्ध आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >