Monday, October 26, 2026

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत, साडे सात तासानंतर सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत

नोकरदारांची सोमवारी सकाळी ऑफिसला पोहोचण्यासाठी त्रेधा तेरपिट झाली. सकाळी 9.30 वाजता रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्थित होण्यासाठी तब्बल सात ते साडे सात तासांचा अवधी लागला.

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी 9.30 च्या दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील भांडूप, कांजुरमार्ग आणि विक्रोळी स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत अचानक बिघाड झाला होता. त्यामुळे नोकरदारांची सोमवारी सकाळी ऑफिसला पोहोचण्यासाठी त्रेधा तेरपिट झाली. सकाळी 9.30 वाजता रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्थित होण्यासाठी तब्बल सात ते साडे सात तासांचा अवधी लागला. यामुळे मुंबईकरांना ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठीही आणि घरी जाण्यासाठीही चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी सुमारे 09.30 वाजता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कांजूरमार्ग स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे कांजूरमार्ग स्थानकावर तसेच विक्रोळी आणि भांडुप दरम्यानच्या मार्गावरील सिग्नल बंद पडले, ज्याचा परिणाम उपनगरीय रेल्वे सेवांवर झाला. ही घटना घडल्यानंतर, मध्य रेल्वेने मुंबई लोकलची सेवा कायम ठेवण्यासाठी वाहतूक धीम्या गतीने चालू ठेवली. त्यामुळे अनेक नोकरदारांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसमध्ये लेटमार्क लागला. मध्य रेल्वेकडून लोकलची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी त्वरित आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

कांजूरमार्ग स्थानकावर आणि विक्रोळी- भांडुप दरम्यान 'ए-बोर्ड' अधिकाराद्वारे उपनगरीय लोकल चालवण्यात आल्या. उपनगरीय रेल्वे वरील विक्रोळी आणि भांडुप स्थानकादरम्यान 'डाउन धिम्या' आणि 'डाउन जलद' मार्गांवर, तर, भांडुप आणि विक्रोळी स्थानकादरम्यान 'अप धिम्या' आणि 'अप जलद' मार्गावर 'ॲब्सोल्युट ब्लॉक वर्किंग' प्रणाली लागू करण्यात आली. याव्यतिरिक्त, निर्धारित सुरक्षा नियमांनुसार 'टीडी 912' अधिकारांतर्गतही उपनगरीय लोकलचे परिचालन करण्यात आले. या व्यवस्थेअंतर्गत चालवण्यात आलेल्या पहिल्या गाड्यांमध्ये विक्रोळी येथून सुटणारी 'डाउन धिम्या' मार्गावरील गाडी क्रमांक K 39 आणि 'डाउन जलद' मार्गावरील गाडी क्रमांक BL 11 यांचा समावेश होता.

सिग्नल यंत्रणेमध्ये झालेली बिघाड दुरुस्त करण्यासाठी त्वरित पावले उचलण्यात आली. दोन्हीही अप आणि डाऊन मार्गांवर टप्प्याटप्प्याने सिग्नल यंत्रणा पूर्ववत करत वाहतूक सुरू करण्यात आली. डाउन जलद मार्गावरील वाहतूक दुपारी 04.10 मिनिटांनी पूर्ववत झाली. अप जलद मार्गावरील वाहतूक सायंकाळी 04.46 मिनिटांनी पूर्ववत झाली. डाउन धीमी मार्गावरील वाहतूक सायंकाळी 05.30 मिनिटांनी पूर्ववत झाली. अप धीमी मार्गावरील वाहतूक सायंकाळी 06.18 मिनिटांनी पूर्ववत झाली. मध्य रेल्वेकडून, प्रवाशांनी रेल्वे रुळांवरून चालणे किंवा रूळ ओलांडणे टाळावे. एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी कृपया फूट ओव्हर ब्रिज (पादचारी पूल), एस्केलेटर किंवा लिफ्टचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >