Wednesday, October 28, 2026

मुंबई लोकलचा अनोखा डबा! आता सामान्य तिकीट काढून घ्या फर्स्ट क्लासचा आनंद

मुंबई लोकल म्हटली की डोळ्यांसमोर येते ती अलोट गर्दी. या रोजच्या गर्दीतून थोडा दिलासा मिळावा म्हणून अनेक प्रवासी जास्त पैसे मोजून फर्स्ट क्लासने प्रवास करणे पसंत करतात. फर्स्ट क्लासमध्ये प्रवाशांना गादीच्या मऊ सीट्सवर बसून सुखकर प्रवास करता येतो. पण जर तुम्हाला सेकंड क्लासच्या तिकिटातच फर्स्ट क्लाससारख्या गादीच्या सीटवर बसून प्रवास करायला मिळाला तर? आश्चर्य वाटेल, पण मुंबईत सध्या असाच एक अनोखा प्रवास चर्चेचा विषय ठरत आहे.

हार्बर मार्गावर धावणाऱ्या एका विशेष लोकलमध्ये हा प्रकार पाहायला मिळत आहे. सानपाडा कारशेडमधून येणाऱ्या या ट्रेनमधील एका डब्याने सध्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ट्रेनमध्ये ‘2133C’ या सामान डब्याला लागून असलेल्या ‘1020 B’ क्रमांकाच्या डब्याचे इंटिरिअर पूर्णपणे बदललेले दिसते. सामान्यतः सेकंड क्लासमध्ये लोखंडी किंवा फायबरच्या सीट्स असतात, मात्र या विशिष्ट कोचमध्ये थेट फर्स्ट क्लासप्रमाणेच मऊ गादीच्या सीट्स बसवण्यात आल्या आहेत.

कुठे अनुभवता येईल हा प्रवास?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 किंवा 2 वरून सुटणाऱ्या या लोकलमध्ये हा डबा पाहायला मिळतो. सेकंड क्लासचे भाडे देऊन फर्स्ट क्लासची सोय मिळत असल्याने या डब्यात चढणारे प्रवासीही सुरुवातीला काहीसे गोंधळात पडत आहेत. सोशल मीडियावर या डब्याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर तो तुफान व्हायरल झाला. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून त्यावर मजेशीर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका युझरने लिहिले की, "पहिलीच वेळ असल्याने मी सेकंड क्लासमध्येच चढले आहे ना, हे निश्चित करण्यासाठी दोनदा बाहेर पडून बोर्ड पाहिले." तर काहींनीCentral आणि Harbour मार्गावर अशा आणखी काही ट्रेन असल्याचा दावाही केला आहे.

सेकंड क्लासमध्ये अशा आलिशान सीट्स कशा काय आल्या, याविषयी रेल्वेकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, रेल्वेच्या नूतनीकरण किंवा दुरुस्तीच्या कामादरम्यान जुन्या फर्स्ट क्लासच्या सीट्स येथे वापरल्या असाव्यात, किंवा डब्यांची पुनर्रचना करताना तांत्रिकदृष्ट्या हा कोच जोडला गेला असावा, असा अंदाज बांधला जात आहे. कारण काहीही असो, मुंबईकरांच्या रोजच्या धावपळीच्या प्रवासात हा डबा मात्र कौतुकाचा आणि आश्चर्याचा विषय बनला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >