मुंबई : ससून डॉकचा सर्वांगीण कायापालट करून देशातील आदर्श गोदी बनवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मच्छीमारांच्या मूलभूत सुविधांपासून स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सुरक्षेपर्यंतच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष असून, यापुढील काळातही विकासकामे वेगाने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी दिली. ससून डॉकमधील महिला मच्छीमारांना मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. या वेळी राणे यांनी गोदीतील १४ विकासकामे पूर्ण झाल्याची माहिती देत उर्वरित कामेही वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली.
मुंबईतील ससून गोदी येथे बुधवारी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत महिला मच्छीमारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. किटमध्ये हातमोजे, बूट, हेड गिअर, फिंगर कॉटन आणि मास्क यांचा समावेश होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी आमदार राजेश राठोड यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. ससून डॉकमधील महिला मच्छीमारांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांचा विचार करून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपण मंत्री झाल्यापासून गोदीच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला. माजी आमदार राजेश राठोड यांच्यासह लोकप्रतिनिधींनीही विधानमंडळात मच्छीमार महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडली. मासेविक्री करताना महिलांना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना आवश्यक सुविधा आणि सुरक्षितता मिळावी, या उद्देशाने सुरक्षा किटचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महायुती सरकारने मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी निर्णय घेण्याबरोबरच त्यांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे, असे राणे म्हणाले. राज्य सरकारच्या पहिल्या १०० दिवसांत महाराष्ट्राने मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ मच्छीमारांनाही मिळण्याचा मार्ग खुला झाला. राज्यातील मच्छीमारांसाठी केंद्राच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेव्यतिरिक्त स्वतंत्र राज्यस्तरीय योजना नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करण्यात आली. या योजनेसाठी १ हजार २४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यातून मच्छीमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकनेते स्वर्गीय ...
ससून डॉकच्या विकासाबाबत बोलताना राणे यांनी प्रसाधन गृहाचे नूतनीकरण, सुरक्षा रक्षकांच्या केबिनचे नूतनीकरण, भूमिगत पाण्याच्या टाकीपर्यंत पाइपलाइन, कचराकुंड्यांची उपलब्धता, जाळी विणकाम गृह व कार्यशाळा, विद्युत उपकेंद्राचे बांधकाम, बोलार्ड आणि मुरिंग रिंगची उभारणी, भूमिगत पाण्याच्या टाकीचे बांधकाम, ओव्हरहेड पाण्याची टाकी पाडणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीचे काम आणि पंप हाऊस यांसह विविध कामांचा उल्लेख केला. या कामांपैकी एकूण १४ कामे पूर्ण झाली असून, क्ले वॉलचे काम ८० टक्के पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित कामेही निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
महिला मच्छीमारांना देण्यात आलेल्या सुरक्षा किटमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास सुरू असल्याचेही राणे यांनी नमूद केले. मासे आणि कोळंबी हाताळताना महिलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तमिळनाडूमधील तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. इंडोनेशियासारख्या देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक पद्धतींचाही अभ्यास केला जात आहे. गोदीतील कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी फिनलंडमधील कंपन्या तसेच परदेशातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याबाबतही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मच्छीमारांचे जीवन अधिक सुखकर करणार
ससून डॉकमध्ये काम करणाऱ्या विविध स्तरांवरील कामगारांना ओळखपत्रे देण्याची गरजही राणे यांनी अधोरेखित केली. गोदीतील कामकाज अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. मच्छीमारांच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून उपाय केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. “ससून डॉकचा असा कायापालट करू की, पूर्वीची गोदी कशी होती, याचा विसर पडेल. देशात एक आदर्श गोदी उभारण्याच्या दृष्टीने सरकार काम करेल. जनतेचा पैसा खर्च करताना कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक असून, मच्छीमारांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे", असेही त्यांनी सांगितले.