
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी तपासाची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली कार्यवाही, तपास पूर्ण होण्यासाठी लागणारा संभाव्य कालावधी तसेच तपासातील प्रलंबित बाबींबाबत अधिकाऱ्यांकडे सविस्तर विचारणा केली. या प्रकरणाचा तपास अधिक गतिमान करून तो पारदर्शकपणे आणि विनाविलंब पूर्ण करण्याची आवश्यकता जय पवार यांनी अधोरेखित केली.
“अजितदादांच्या विमान अपघातामागील सत्य समोर येणे हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून, दादांवर अपार प्रेम करणाऱ्या लाखो नागरिकांच्या विश्वासाचा विषय आहे,” अशी भूमिका जय अजितदादा पवार यांनी यावेळी मांडली. या अपघाताबाबत जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणे, तपासातील प्रत्येक महत्त्वाच्या बाबीचा सखोल तपास होणे आणि सत्य जनतेसमोर येणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तपासात कोणतीही दिरंगाई न होता सर्व संबंधित बाबींची गांभीर्याने चौकशी करून दोषींना जबाबदार धरण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा जय पवार यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार विक्रम काकडे उपस्थित होते. अजितदादांच्या अपघाताचे सत्य समोर येईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच राहील, असा ठाम निर्धारही जय अजित पवार यांनी व्यक्त केला.
View this post on Instagram
28 जानेवारी रोजी काय घडले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. लँडिंगच्या प्रक्रियेदरम्यान विमान कोसळून झालेल्या या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सहाही प्रवाशांनी आपले प्राण गमावले. विमान धावपट्टीवर उतरत असताना (Landing) अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि विमानाचे नियंत्रण सुटले. पाहता पाहता विमान जमिनीवर आदळले आणि त्याला भीषण आग लागली. हा अपघात इतका भयानक होता की, विमानाचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि परिसरात धुराचे काळे लोट पसरले होते. या दुर्घटनेत अजित पवारांसोबत त्यांचे सहकारी आणि क्रू मेंबर्स अशा एकूण 6 जणांचा मृत्यू झाला.





