
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण नियंत्रण तसेच आरोग्यविषयक दुष्परिणामाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये संदेश द्यावा. तसेच, सर्व शासकीय आणि खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी उपक्रम राबवावेत. प्रदूषण करणारे फटाके फोडण्याऐवजी हरित फटाक्यांचा वापर करावा, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यावेळी दिल्या. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश तसेच वायू गुणवत्ता सुधारणेसाठी उपाययोजनांबाबत मंगळवारी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी आढावा बैठक पार पडली. त्यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी हे आवाहन दिले.अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (पर्यावरण व वातावरणीय बदल) अविनाश काटे, सर्व परिमंडळीय सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. आयुक्त म्हणाल्या की, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी केली आहे. तसेच, शाळा, रुग्णालये, शासकीय कार्यालये, न्यायालये आदी शांतता क्षेत्रातही फटाके फोडण्यास प्रतिबंध लावले आहेत. फटाक्यांच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर काटेकोरपणे पालन होईल, हे सुनिश्चित करावे.
Maharashtra News: आदिवासी समाजाच्या शिक्षण, वनहक्क, पुनर्वसन, पाणीपुरवठा, आधार कार्ड आणि कामगार कल्याणाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक ...
बांधकामाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ कारवाई करा
मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेकडून २८ मुद्यांचा समावेश असलेली मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेली आहे. या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात दिसून आली पाहिजे. त्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करून उपाययोजनांची नियमित तपासणी करावी. बांधकामस्थळांमुळे होणारे धूळ प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांनी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे बंधनकारक आहे. बांधकाम परिसर स्वच्छ ठेवणे, धूळ हवेत पसरणार नाही यासाठी योग्य उपाययोजना करणे आणि बांधकामस्थळांवरील नियमांचे पालन करणे, याबाबत संबंधितांनी गांभिर्याने कार्यवाही करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ आवश्यक कारवाई कराव्यात, असे निर्देश आश्विनी भिडे यांनी दिले.
वायू गुणवत्ता मापन यंत्रणा व सेन्सर बंद असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई
मुंबईतील वायू गुणवत्ता मापन केंद्रे, सेन्सर तसेच संबंधित यंत्रणा नियमितपणे कार्यरत राहतील, याची दक्षता घ्यावी. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करून मुंबईतील वायू गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने ठोस परिणाम साधावेत. वायू गुणवत्ता मापन यंत्रणा व सेन्सर बंद असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिले. तसेच, विविध अद्ययावत संयंत्रांचा वापर करुन रस्त्यांची स्वच्छता करावी आणि धूळ नियंत्रणासाठी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करावे, असे निर्देश आश्विनी भिडे यांनी यावेळी दिले.
कसे असतात हरित फटाके
पारंपरिक फटाक्यांपेक्षा कमी आवाज आणि कमी वायू तयार होतो.सामान्य फटाके साधारण १६० डेसिबलपर्यंत आवाज करतात, तर हरित फटाक्यांचा आवाज ११० ते १२५ डेसिबल दरम्यान असतो.यात बेरियम नायट्रेट सारखी घातक रसायने नसतात किंवा त्यांचे प्रमाण खूप कमी असते. यात सल्फर आणि ॲल्युमिनियमचे प्रमाणही नियंत्रित असते.हे फटाके फुटल्यानंतर हवेत पाण्याची वाफ तयार होते, ज्यामुळे धूळ हवेत पसरण्याऐवजी खाली बसते. यात ॲल्युमिनियमचे प्रमाण खूप कमी करून मॅग्नेशियमचा पर्याय वापरला जातो, ज्यामुळे प्रदूषण घटते. खऱ्या हरित फटाक्यांच्या बॉक्सवर सी.एस.आयआर - निरीचा लोगो आणि विशेष क्यू आर कोड दिलेला असतो.





