Wednesday, October 28, 2026

Nashik : व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, नाशिकमध्ये राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आवाहन

राष्ट्रनिर्मिती ही प्रत्येक नागरिकाच्या छोट्या-छोट्या योगदानातून साकार होते. विकसित भारताच्या भक्कम पायामध्ये प्रत्येक युवकाने आपल्या कार्याची एक वीट रचावी, असे आवाहन राज्यपालांनी केले.

नाशिक : युवकांनी व्यसनांपासून दूर राहून चांगल्या सवयी, शिस्त आणि एकाग्रतेच्या बळावर स्वतःचे चारित्र्य घडवावे. स्वतः व्यसनमुक्त राहण्यासोबतच मित्र, सहाध्यायी, कुटुंबीय आणि समाजातील नागरिकांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रोत्साहित करावे. युवकांच्या सामर्थ्याचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत २०४७ साकार करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक आणि एस. जे. ए. ॲनालिटिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महाकवी कालिदास कलामंदिरात आज सकाळी ‘सशक्त युवा, सशक्त भारत’ अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात राज्यपाल वर्मा बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, न्या. दिलीप घुमरे, न्या. मदन गोसावी, ॲड महेश सावंत, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे आदी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी उपस्थितांना व्यसनमुक्त राहण्याची शपथ दिली.

युवकांची शक्ती ही राष्ट्राची अमूल्य संपत्ती

राज्यपाल वर्मा म्हणाले की, भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. देशातील सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील असून, ही युवा शक्ती विकसित भारताच्या उभारणीसाठी मोठी संधी आहे. युवकांच्या क्षमतेचा योग्य उपयोग झाल्यास विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी भक्कम पाया निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून एकाग्रता, शिस्त आणि सकारात्मक विचारांच्या बळावर यश संपादन करावे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी राष्ट्रनिर्मितीसाठी खंबीर मनोबल आणि ध्येयाप्रती समर्पण आवश्यक असल्याचे सांगितले.

शिक्षणाचा खरा उद्देश चारित्र्यनिर्मिती

शिक्षण म्हणजे केवळ पदव्या मिळविणे नव्हे, तर व्यक्तीचे चारित्र्य घडविणे होय. शिक्षणातून विवेक, शिस्त, चांगल्या सवयी आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विकसित झाली पाहिजे. व्यक्तीच्या सवयींमधून त्याचे चारित्र्य घडते आणि चारित्र्यच त्याच्या भविष्याची दिशा ठरवते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी अंगीकारून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे. अमली पदार्थांचे व्यसन हे युवकांसमोरील गंभीर आव्हान आहे. व्यसनामुळे एकाग्रता कमी होते आणि यशाच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनमुक्त राहून समाजातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे त्यांनी नमूद केले.

प्रत्येक युवकाचे योगदान म्हणजे राष्ट्रनिर्मितीचा पाया

आजच्या संधीचा योग्य उपयोग करून युवकांनी स्वतःचे भविष्य घडविण्यासोबतच मित्रांना योग्य दिशा द्यावी आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे. राष्ट्रनिर्मिती ही प्रत्येक नागरिकाच्या छोट्या-छोट्या योगदानातून साकार होते. विकसित भारताच्या भक्कम पायामध्ये प्रत्येक युवकाने आपल्या कार्याची एक वीट रचावी, असे आवाहन राज्यपालांनी केले.

विद्यार्थ्यांनी घेतलेली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता तिचे आयुष्यभर पालन करावे. स्वतः व्यसनमुक्त राहणे, इतरांनाही व्यसनांपासून दूर राहण्यासाठी मदत करणे आणि समाजात जागरूकता निर्माण करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. ‘सशक्त भारतासाठी सशक्त युवा’ ही व्यापक लोकचळवळ उभी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपालांनी केले.

व्यसनांपासून दूर राहून पालकांच्या स्वप्नांचा सन्मान करा - पालकमंत्री गिरीश महाजन

पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कष्ट घेत असतात. त्यांच्या स्वप्नांचा आणि त्यागाचा आदर राखून विद्यार्थ्यांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहावे आणि व्यसनांच्या प्रलोभनांना बळी पडू नये. अमली पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याचे गंभीर नुकसान होते. व्यसनाधीनतेमुळे व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यासोबतच संपूर्ण कुटुंबालाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मित्रांच्या दबावाखाली न येता व्यसनांना ठामपणे नकार द्यावा. स्वतः व्यसनांपासून दूर राहण्याबरोबरच आपल्या मित्रांनाही योग्य मार्गदर्शन करावे. भारत हा तरुणांचा देश असून युवक ही राष्ट्राची खरी शक्ती आहे. देशाला विकसित राष्ट्र आणि जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांचे सशक्त, निरोगी, शिस्तबद्ध आणि राष्ट्रप्रेमाने प्रेरित असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >