INDW vs ZIMW 3rd ODI: झिम्बाब्वेने तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला, भारताच्या वाटेला प्रथम गोलंदाजी
भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात तिसरा वनडे सामना होत आहे. भारताने यापू्र्वीच दोन सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना औपचारिक आहे, पण व्हाईट वॉश देण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.
October 28, 2026 01:56 PM
INDW vs ZIMW 3rd ODI: झिम्बाब्वेने तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला, भारताच्या वाटेला प्रथम गोलंदाजी (Photo: @BCCIWomen)
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा वनडे सामना वडोदऱ्याच्या कोटम्बी स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. कारण भारताने सलग दोन वनडे सामन्यात झिम्बाब्वेला पराभवाची धूळ चारून मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा वनडे सामना जिंकून झिम्बाब्वेला क्लिन स्विप देण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. तर झिम्बाब्वे संघ शेवटचा सामना जिंकून या मालिकेचा शेवट गोड करण्याच्या उद्देश्याने मैदानात उतरणार आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल हा झिम्बाब्वेच्या बाजूने लागला आणि कर्णधार जोसेफिन न्कोमोने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. जोसेफिन न्कोमो म्हणाली की, 'मला बॅटिंग करायला आवडेल. फलंदाजीसाठी खेळपट्टी चांगली दिसते आहे. आम्हाला फक्त काही धावा करायच्या आहेत. प्लेइंग 11 मध्ये फक्त एक बदल केला आहे. फ्रान्सिस्का चिपारे संघात आली आहे.'
कर्णधार जोसेफिन न्कोमो म्हणाली की...
या वर्षी अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या फायद्यांवर झिम्बाब्वेची कर्णधार जोसेफिन न्कोमो म्हणाली की, 'निश्चितच, मिळालेला अनुभव चांगला आहे. आता आम्हाला स्पष्टपणे माहित आहे की आम्हाला कोणती उणीव भरून काढायची आहे आणि मायदेशी परतल्यावर कशावर काम करायचे आहे. मुलींसाठी हा एक चांगला अनुभव ठरला आहे. आम्ही या स्तरावर जास्त खेळलो नाही, त्यामुळे हो, यामुळे मुलींना यापैकी एका लीगमध्ये निवडले जाण्याची संधी मिळू शकते.'
काय म्हणाली स्मृती मंधाना?
स्मृती मंधानाने प्लेइंग 11 बाबत सांगितलं की, 'आमच्या संघात तीन बदल आहेत. ऋचा, तेजल हसबनीस आणि श्री चरानी यांच्या जागी क्रांती, हरलीन आणि यास्तिका आल्या आहेत. आमचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेशी आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. ते सामने रात्रीचे असतील आणि खूप दव पडेल हे लक्षात घेता, त्या सर्व परिस्थितींमध्ये तीन वेगवान गोलंदाज आदर्श ठरतील याचा आम्ही विचार केला आबे. सर्वोत्तम संयोजन कोणते आहे हे आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू. पण हो, मला वाटते की जागतिक क्रिकेट अशा दिशेने वाटचाल करत आहे, जिथे आमच्या संघात अनेक अर्धवेळ फिरकी गोलंदाज असल्यामुळे, आम्ही नेहमीच एका अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संधी देऊ शकतो.'
वुमन्स प्रीमियर लीग 2027 स्पर्धेसाठी केरळच्या कोच्चीमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलाव प्रक्रियेसाठी एकूण 150 खेळाडूंची निवड झाली आहे. पण ...