मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या महापरिनिर्वाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांच्या स्वागतासाठी आणि सुविधांसाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली असून, सुरक्षा, वाहतूक आणि आरोग्याच्या प्रभावी व्यवस्थापनाचे निर्देश देण्यात आले आहेत. आगामी 6 डिसेंबर रोजी मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर लाखो अनुयायी अभिवादनासाठी दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनुयायांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाकडून तयारी सुरू झाली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी नुकत्याच पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत सर्व संबंधित विभागांनी परस्परांशी समन्वय साधून चोख नियोजन करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.
या बैठकीत सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, रेल्वे सुविधा, आरोग्य आणि स्वच्छता यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवाजी पार्क परिसर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांच्या आणि स्मारकांच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यास सांगण्यात आले आहे. गर्दीच्या नियंत्रणासाठी सीसीटीव्ही यंत्रणा आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा प्रभावी वापर केला जाणार असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांना मार्गातील बदलांची माहिती आगाऊ दिली जाईल.
रेल्वे आणि बस सेवेचे विशेष नियोजन
दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला, वांद्रे आणि मुंबई सेंट्रल या प्रमुख रेल्वे स्थानकांवर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता विशेष व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनुयायांच्या सोयीसाठी अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याची विनंती करण्यात आली असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 6 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक टाळण्याबाबत विचार करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाला करण्यात आले आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडूनही (एसटी) अतिरिक्त बससेवेचे नियोजन करण्यात येत आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण नियंत्रण तसेच आरोग्यविषयक दुष्परिणामाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. स्थानिक ...
आरोग्य, स्वच्छता आणि प्रशासकीय तरतूद
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 5 आणि 6 डिसेंबर रोजी विशेष वैद्यकीय तपासणी शिबिरे, आरोग्य जनजागृती आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाईल. शिवाजी पार्क व लगतच्या परिसरात अस्वच्छता टाळण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाईल. याशिवाय, 6 डिसेंबर रोजी राज्यात ड्राय डे घोषित करण्याबाबत आणि सार्वजनिक सुट्टीसंदर्भातील परिपत्रक वेळेत प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सामाजिक न्याय विभागातर्फे वृत्तपत्रांमध्ये विशेष जाहिराती देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार केला जाईल. तसेच, शिवाजी पार्क परिसरात पुस्तकांचे स्टॉल उभारून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती अनुयायांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. या सर्व व्यवस्थांसाठी अंदाजे 25 ते 30 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून, मुंबई महानगरपालिकेने या निधीची तरतूद आणि प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे निर्देश उपाध्यक्ष बनसोडे यांनी दिले. या बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि चैत्यभूमी समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.