नाशिक : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील वधू-वरांना विवाहासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी समाज कल्याण विभागामार्फत कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणाऱ्या पात्र स्वयंसेवी संस्थांना शासनाकडून अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.
प्रत्येक जोडप्यामागे संस्थेला ४ हजार रुपये अनुदान
कन्यादान योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक जोडप्यामागे संबंधित स्वयंसेवी संस्थेला ४ हजार रुपये अनुदान देण्यात येते. याशिवाय, योजनेच्या निकषांनुसार पात्र नवदांपत्याला २५ हजार रुपये अनुदान देण्याची तरतूद आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांना विवाहाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येतो.
कन्यादान योजनेसाठी कोण पात्र ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वधू आणि वर हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. नवदांपत्यातील दोघेही किंवा त्यांपैकी एकजण अनुसूचित जाती, नवबौद्ध अथवा योजनेच्या निकषांनुसार पात्र प्रवर्गातील असावा. योजनेसाठी वधूचे वय १८ वर्षे पूर्ण आणि वराचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच दोघांचेही वय २८ वर्षांपेक्षा कमी असावे. वधू-वरांच्या प्रथम विवाहासाठी या योजनेचा लाभ घेता येतो. योजनेच्या निकषांनुसार विधवा महिलेलाही दुसऱ्या विवाहासाठी लाभ घेता येण्याची तरतूद आहे.विवाहासंदर्भात बालविवाह प्रतिबंधक कायदा किंवा हुंडा प्रतिबंधक कायद्यातील कोणत्याही तरतुदीचा भंग झालेला नसल्याबाबत संबंधितांनी लेखी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले असावे.
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी प्रशासनाने ...
स्वयंसेवी संस्थांसाठी आवश्यक अटी
सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणारी स्वयंसेवी संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे. अर्जासोबत संस्थेच्या नोंदणीचे प्रमाणपत्र, आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित पुरावे सादर करणे आवश्यक आहे.अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील वधू-वरांचे सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या संस्थांनी विवाह सोहळा होण्याच्या किमान ३० दिवस आधी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक कार्यालयाशी संपर्क साधून प्रस्ताव सादर करावा.
अर्ज कुठे करावा ?
कन्यादान योजनेचे पात्रता निकष, अनुदानाची तरतूद आणि अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक संस्थांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक कार्यालयाशी संपर्क साधावा.
कार्यालयाचा पत्ता : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक क्लबसमोर, नाशिक-पुणे रोड, नाशिक.
पात्र संस्थांनी विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.