Thursday, October 29, 2026

मुंबईत BMC च्या धूळ नियंत्रण मोहीम अंतर्गत ६९.५५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता

मुंबईत BMC च्या धूळ नियंत्रण मोहिमेला वेग आला असून ६९.५५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. या मोहिमेत ३९.७५ टन धूळमाती आणि ११५ टन बांधकाम व पाडकामातील राडारोडा जमा करण्यात आला.

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्यामुळे (सी अँड डी) होणाऱ्या प्रदूषणास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने, मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून २८ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रणासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत २९ ऑक्टोबर २०२६६९.५५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सखोल स्वच्छता करण्यात आली. यामध्ये एकूण ३९.७५ टन धूळ आणि ११५ टन बांधकाम व पाडकाम राडारोडा जमा करण्यात आला.

महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या नेतृत्वात घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याच अनुषंगाने, मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रणासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या अंतर्गत महानगरपालिकेच्या २६ प्रशासकीय विभागांतील (वॉर्ड) १४६ रस्त्यांवर स्वच्छता करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेत मुंबईतील महत्त्वाच्या आणि मोठ्या वाहतूक मार्गांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये वांद्रे-कुर्ला जोडमार्ग (बीकेसी कनेक्टर), सांताक्रूझ-चेंबूर जोड मार्ग, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी जोड मार्ग , घाटकोपर-मानखुर्द मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग (एस. व्ही. रोड), लिंक रोड, कार्टर रोड आणि शीव (सायन)-मानखुर्द मार्ग यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या प्रमुख मार्गांशिवाय महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांतील धूळप्रवण रस्ते आणि परिसरात स्वच्छता व धूळ नियंत्रणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.

यामध्ये रस्त्यांची सखोल स्वच्छता, झाडलोट व स्क्रॅपिंग, रस्त्यांच्या कडेला साचलेली धूळ व गाळ हटविणे, दुभाजक, पदपथ, रस्त्याच्या कडेचा बांध (कर्ब स्टोन) व धूळप्रवण ठिकाणी पाण्याची फवारणी व मिस्टिंग तसेच जमा झालेल्या कचऱ्याची तातडीने उचल व योग्य विल्हेवाट यावर भर देण्यात येत आहे. या मोहिमेत यांत्रिक स्वच्छतेसोबत प्रत्यक्ष मनुष्यबळाचा वापर करून रस्त्यांवरील धूळ, गाळ व इतर कचरा हटविण्यावर भर देण्यात येत आहे. विशेषतः धूळप्रवण ठिकाणी मिस्टिंग व आवश्यकतेनुसार पाण्याची फवारणी करून धूळ हवेत पसरण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

या अंतर्गत गुरुवारी एकूण २९ मार्गांवर सुमारे ६९.५५ किलोमीटर अंतर परिसरात स्वच्छता करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ३९.७५ टन धूळ आणि ११५ टन बांधकाम व पाडकाम राडारोडा जमा करण्यात आला. तसेच, त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. यासाठी महानगरपालिकेचे ५४१ स्वच्छता कर्मचारी, ४७१ स्वयंसेवक अविरतपणे कार्यरत होते. तसेच, १८ जेसीबी, २० डंपर, २१ मल्टीपर्पज मस्टींग मशीन, २१ मेकॅनिकल पॉवर स्वीपर (MPS), ६ वॉक-बिहाइंड ई-स्वीपर, ६ डिव्हायडर क्लीनिंग मशीन आदी संयंत्रांचा यासाठी वापर करण्यात आला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >