
दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कुशार्वत तीर्थावर ऐतिहासिक सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सोहळ्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या विशेष उपस्थित राहणार आहेत. तसेच या सोहळ्यानिमित्त राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह अनेक महत्त्वाचे (VVIP) पाहुणे 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी त्र्यंबकेश्वरच्या नियोजित दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आणि इतर व्यक्तींच्या सुरक्षेची खबरदारी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यादरम्यान संभाव्य गर्दीचे नियंत्रण करणे आणि चोख सुरक्षा व्यवस्था राखणे प्रशासनासाठी अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सचिवांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या आदेशानुसार, दिनांक 30 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 12:00 वाजेपासून ते दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत (किंवा कार्यक्रम संपेपर्यंत) त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कुशार्वत तीर्थाची दर्शन व्यवस्था सामान्य भाविकांसाठी बंद राहणार आहे.
Nashik : कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७ (१) (सी) अन्वये नाशिक पोलीस ...
कोणाला मिळणार प्रवेश?
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत त्र्यंबकेश्वर शहरातील स्थानिक रहिवासी आणि जिल्हा प्रशासनाकडून किंवा देवस्थान ट्रस्टकडून अधिकृतपणे वितरीत करण्यात आलेल्या वैध दर्शन पासधारक व्यक्तींनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. इतर सर्वसामान्य भाविकांनी या कालावधीत दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये हे आदेश जारी केले आहेत. प्रशासनाच्या या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 134 नुसार कायदेशीर आणि कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दिला आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




