भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून टी20 मालिकेनंतर वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे.यासाठी कर्णधार शुभमन गिल ऑकलँडमध्ये दाखल झाला असून सराव करत आहे. मात्र त्याच्या कपाळावर लावलेल्या एका डिव्हाइसची चर्चा होत आहे.
टी20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघ कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची तयारी सुरू झाली आहे. 4 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. यासाठी ऑकलँडमध्ये सराव सुरू असून शुभमन गिलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याला कारणंही तसंच आहे. शुभमन गिलच्या कपाळावर एक खास डिव्हाइस लावलं होतं. त्याच्या कपाळावर टेम्पल नावाचं एक फिटनेस ट्रॅकिंग डिव्हाइस लावलं होतं. हे डिव्हाइस पारंपरिक फिटनेस मॅट्रिक्स नसून मेंदूशी निगडीत संकेत ट्रॅक करण्यासाठी तयार केलं आहे. ऑकलँडमध्ये भारतीय संघ सराव करत असताना कर्णधार शुभमन गिल या डिव्हाइससह सराव करताना दिसला. पण गिलने हे डिव्हाइस नेमकं का लावलं होतं? याबाबत सांगितलं नाही. पण दोन प्रमुख भारतीय खेळाडूंकडून त्याचा वापर होत असल्याने उदयोन्मुख तंत्राबाबत चर्चा होत आहे.
टेम्पल डिव्हाइस आहे तरी काय?
नेहमीच्या स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँडच्या पलीकडे जात दीपेंद्र गोयल यांच्या टीमने ‘टेम्पल’ नावाचे एक क्रांतिकारी डिव्हाइस तयार केले आहे. हे डिव्हाइस हातावर न बांधता थेट कपाळाच्या बाजूला, म्हणजेच कानशिलाजवळ लावले जाते. हे गॅजेट मेंदूतील रक्ताभिसरण आणि मेंदूच्या कामकाजाशी संबंधित इतर महत्त्वाच्या शारीरिक बदलांचा अचूक मागोवा घेते. बाजारातील इतर फिटनेस बँड फक्त हृदयाचे ठोके, चालणे आणि झोप मोजतात. याउलट, 'टेम्पल' डिव्हाइस तुमची बौद्धिक कार्यक्षमता आणि ताणतणावाच्या वेळी तुमचे शरीर नेमकी कशी प्रतिक्रिया देते, याचे सखोल विश्लेषण करते.
🚨What is Temple, the device seen on Shubman Gill's forehead?
Here are the details⬇️
@CricSubhayan @IDFCFIRSTBank || #INDvsNZ https://t.co/zhegqDKmDr
— RevSportz Global (@RevSportzGlobal) October 29, 2026
पीव्ही सिंधुने यापूर्वी केला आहे वापर
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधु हीने यापूर्वी या डिव्हाइसचा वापर केला आहे. एप्रिलमध्ये थॉमस आणि उबर कपमध्ये 'टेम्पल'चा वापर केला आणि नंतर ती बीडब्ल्यूएफ जागतिक चॅम्पियनशिपमध्येही डिव्हाइसचा वापर केला होता.